लग्नाआधी एकत्र राहिल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो ! – अभिनेत्री मुमताज
‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे समर्थन करणार्या अभिनेत्री झीनत अमान यांना अभिनेत्री मुमताज यांनी सुनावले !
(लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे)
मुंबई – अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतेच देशातील तरुण-तरुणींना विवाहाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याविषयी विधान केले होते. ‘हे संबंध सुधारण्याची आणि चाचणी करण्याची संधी देते ’, असे त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अभिनेत्री मुमताज यांनी म्हटले की, लग्नाआधी एकत्र राहिल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
मुमताज यांनी म्हटले की,
१. मी झीनत यांच्या लिव्ह-इनच्या सल्ल्याशी सहमत नाही. तुम्ही कितीही लिव्ह-इनमध्ये राहिलात, महिनोन्महिने एकत्र राहिल्यानंतर लग्न यशस्वी होईलच याची शाश्वती काय ? मी तर म्हणते की लग्नच करू नये. आजच्या काळात स्वतःला त्या बंधनात बांधून ठेवायची काय आवश्यकता आहे ? बाळासाठी ? मग जा बाहेर पडा आणि योग्य व्यक्ती शोधा अन् लग्न न करता बाळ जन्माला घाला. काळ खूप पुढे गेला आहे. तुमच्या मुलींना ‘आता पुरुषाची आवश्यकता नाही’, असे सांगत मोठे करा. मी ४० वर्षांपासून विवाहित आहे, लग्न टिकवावे लागते आणि ते सोपे नाही.
२. झीनतने विचार करायला हवा की, ती काय सल्ला देत आहे ? सामाजिक माध्यमात अचानक इतके मोठे विधान करत आहे. मुलांनी लिव्ह-इन संस्कृती स्वीकारली, तर भविष्यात लग्न होणार नाहीत. मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न अशा मुलीशी कराल का जी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात होती ? झीनतचेच उदाहरण घ्या. ती मजहर खानला (झीनत अमान यांचे पती यांना) लग्नाआधी अनेक वर्षांपासून ओळखत होती; पण तरी तिचा लग्नाचा अनुभव वाईट राहिला. त्यामुळे मला वाटते की, तिने नात्यांबद्दल सल्ला देऊच नये.