देश आर्थिक प्रगती करत असला, तरी गरिबी मोठे आव्हान ! – डी. सुब्बाराव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचा दावा !
मुंबई – भारत सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे; परंतु दरडोई उत्पन्न केवळ २ सहस्र ६०० डॉलर (२ लाख १७ सहस्र रुपये) आहे. समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की, अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास या दोन भिन्न गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण चित्रच पालटून जाते. दरडोई उत्पन्नाच्या संदर्भात आपण जगात १३९ व्या स्थानावर आहोत. तसेच आपले दरडोई उत्पन्न ‘ब्रिक्स’ (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची संघटना) आणि ‘जी-२०’ (२० देशांची संघटना) देशांमध्ये सर्वांत अल्प आहे. या आकडेवारीवरून आपण समजू शकतो की, देश आर्थिक प्रगती करत आहे; पण भारतातील गरिबी मोठे आव्हान आहे, असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
सुब्बाराव यांनी म्हटले की, एखाद्या देशाला विकसित राष्ट्र बनण्यासाठी ४ गोष्टी आवश्यक असतात. यात कायद्याचे राज्य, सशक्त राज्य, दायित्व आणि स्वतंत्र संस्था महत्त्वाच्या आहेत. विकसित देश बनण्याचा प्रवास सोपा नसून त्यासाठी आर्थिक प्रगतीसमवेतच सामाजिक विकासाकडेही पूर्ण लक्ष द्यावे लागेल. श्रीमंत देश होणे म्हणजे विकसित राष्ट्र होणे नव्हे. याचे उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया होय.