उंचगाव यात्राकाळात अखंडित वीजपुरवठा करा ! – राजू यादव
कोल्हापूर – उंचगाव मंगेश्वर मंदिराची त्रैवार्षिक यात्रा १९ ते २४ एप्रिल या काळात होत असून सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. यात्राकाळात मंदिरासह अनेक ठिकाणी विद्युत् रोषणाई होते. तरी विजेच्या पुरवठ्यावर अतिरिक्त भार येऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे उंचगाव यात्राकाळात अखंडित वीजपुरवठा करावा, या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक वीज वितरण अभियंता अमोल गायकवाड यांना देण्यात आले. कोणते कर्मचारी कोणत्या भागात आहेत ? त्यांचे क्रमांक सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करू, तसेच नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊ, असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.
वीज वितरण अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यात्राकाळात अतिरिक्त रोहित्र सिद्ध ठेवावे, तसेच ज्या ज्या ठिकाणी वारा सुटून झाडांच्या फाद्यांमुळे वीज खंडित होण्याची शक्यता आहे, तिथे फाद्यांची छाटणी करावी. या प्रसंगी दीपक रेडेकर, सुनील चौगुले, योगेश लोहार, शरद माळी, दत्ता फराकटे, अजित पाटील यांसह अन्य उपस्थित होते.