जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्यास अटक !
बनावट आधारकार्ड आणि ७/१२ चा उतारा सिद्ध केला
पुणे – जामीन मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये जामीनदाराचे बनावट आधारकार्ड आणि ७/१२ चा उतारा सादर करणार्या योगेश सूर्यवंशी अन्य १ या २ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. योगेश अंबुरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी शिव झंवर यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला जामीन मिळण्यासाठी त्याचा भाऊ प्रयत्न करत आहे. न्यायालयाच्या आवारामध्ये झंवर यांच्या भावाला एक जण भेटले. ‘योगेश सूर्यवंशी हा जामीन राहील’, असे त्यांनी सांगितले. झंवर यांच्या अधिवक्त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात योगेश यांना उपस्थित केले. तेव्हा जामीनदार योगेशने स्वत:चे नाव शंकर भिकू राठोड, असे सांगितले. न्यायालयाने संगणकीय प्रणालीमध्ये (सी.आय.एस्. प्रणाली) पडताळणी केली असता जामीनदाराचे नाव शंकर राठोड नसून योगेश सूर्यवंशी असल्याचे समोर आहे. योगेशला अटक करून १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.