कराड शहरातील सर्व अनधिकृत पशूवधगृहे भुईसपाट करण्याचे आदेश द्यावेत ! – शिवशंकर स्वामी, मानद पशूकल्याण अधिकारी
कराड, १५ एप्रिल (वार्ता.) – कराड शहरात ८ अनधिकृत पशूवधगृहे आहेत. त्यामुळे प्रतिदिन मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या होत आहे, ही खेदाची गोष्ट आहे. ‘कराड शहरातील सर्व अनधिकृत पशूवधगृहे भुईसपाट करण्याचे आदेश द्यावेत’, अशी मागणी मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनाही देण्यात आली आहे. निवेदन देतांना स्वामी यांसह वैभव जाधव, अक्षय डिसले, अमित असवले, मयूर ससार, शुभम चव्हाण उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे, कराड येथील अनधिकृत पशूवधगृहात प्रतिदिन शेकडो गोवंशियांची अनिर्बंधपणे हत्या केली जाते. हे मांस मुंबई, पुणे, कर्नाटक आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवले जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक पोलीस ठाणे आणि स्थानिक नगरपालिका या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, हे वास्तव आहे. यामुळे सामाजिक गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे, तसेच गोवंशियांची संख्या घटल्यामुळे कृषी क्षेत्राचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कराड शहरात शिक्षण कॉलनी, मुजावर कॉलनी, सूर्यवंशी मळा, ईदगाह मैदान, खराडे कॉलनीतील नूर मोहल्ला या ठिकाणी ८ अनधिकृत पशूवधगृहे चालू आहेत. ही पशूवधगृहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून गोमातेची विटंबना करत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा पोलिसांच्या साहाय्याने अनधिकृत पशूवधगृहातून मोठ्या प्रमाणात गोमांस कह्यात घेऊन संबंधितांवर ९ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वीही अनेक वेळा कराड नगरपालिकेशी अनधिकृत पशूवधगृह भुईसपाट करण्याविषयी पत्रव्यवहार झाले आहते; मात्र अद्यापपर्यंत पालिका प्रशासनाकडून याची कोणतीही नोंद घेण्यात आलेली नाही.