सलग ३ दिवस पहाटे विशिष्ट वेळेमध्ये पडलेल्या स्वप्नांचा देवाच्या कृपेने साधकाला उलगडलेला अर्थ !
‘१ ते ३.६.२०२२ या ३ दिवसांत मला सकाळी विशिष्ट वेळेमध्ये स्वप्ने पडायची आणि झोपून उठल्यानंतर श्लोक म्हणत असतांना मला ती स्वप्ने आठवायची. तेव्हा देवाने मला त्या स्वप्नांमागील कार्यकारणभाव उलगडून दाखवला.
१. स्वप्नात सहसाधकाने अहंच्या पैलूंची जाणीव करून दिल्यावर साधकाने त्याचे समर्थन करणे आणि ‘अजून कुठे न्यून पडतो ?’, असा विचार करण्याविषयी देवाने सुचवणे
१.६.२०२२ या दिवशी पहाटे मला स्वप्नात पुढील दृश्य दिसले, ‘एका प्रसंगात मला माझे एक सहसाधक माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंची जाणीव करून देत आहेत. त्या वेळी मी त्यांना सांगत आहे, ‘मी ते स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू दूर होण्यासाठी आधी प्रयत्न केले आहेत, तसेच सहसाधकांनी मला ‘यात आता पालट झाला आहे’, असेही सांगितले आहे.’ त्या वेळी ते सहसाधक म्हणत आहेत, ‘आणखी एका सहसाधिकेने सांगितले की, तुमच्या बोलण्यातून ‘अधिकारवाणी असणे’, ‘मला कळते’, असे वाटणे’ इत्यादी अहंचे पैलू जाणवतात.’
सकाळी उठल्यावर मला हे स्वप्न आठवले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी ‘कोणते प्रयत्न केले ?’, हे सांगण्यापेक्षा ‘मी अजून कुठे न्यून पडतो ?’, असा विचार करायला पाहिजे. त्यानंतर मी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू स्वीकारून सूक्ष्मातून सहसाधक अन् ती साधिका यांच्याकडे क्षमायाचना केली.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले वस्तूंच्या माध्यमातूनही रक्षण करतात’, याची साधकाला स्वप्नाच्या माध्यमातून आलेली प्रचीती !
२.६.२०२२ या दिवशी पहाटे पडलेल्या स्वप्नात मला पुढील दृश्य दिसले. ‘आदल्या दिवशी एका साधकाने मला एक कैरी दिली होती. ती हिरवी होती. दुसर्या दिवशी ती कैरी खालच्या बाजूला पिवळसर होऊन पूर्ण काळी झाली होती. तेव्हा मी देवाला विचारले, ‘देवा, काल हिरवी असलेली कैरी एका रात्रीत पिकून खालच्या बाजूला काळी कशी पडली ?’ त्या वेळी देवाने मला पुढील विचार दिला, ‘कैरीने तुझ्यावरील त्रासदायक शक्तींचे आक्रमण स्वतःवर घेतले आहे.’
सकाळी उठल्यानंतर हे स्वप्न आठवल्यावर मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः आणि इतर वस्तूंच्या माध्यमातूनही साधकांचे रक्षण करतात’, हे माझ्या लक्षात आले अन् याविषयी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३. स्वप्नात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकाला आलिंगन दिल्यावर साधक सद्गदित होण्यामागील देवाने लक्षात आणून दिलेले कारण !
३.६.२०२२ या दिवशी पहाटे मला स्वप्नात पुढील दृश्य दिसले, ‘हिंदु जनजागृती समितीच्या एका शिबिराच्या वेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मला आलिंगन दिले. त्या वेळी मी त्यांना माझ्या मनाची स्थिती सूक्ष्मातून सांगत आहे आणि त्यानंतर मी सद्गदित झालो आहे.’
सकाळी उठल्यानंतर ‘सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या कुशीत असतांना मी सद्गदित का झालो ?’, असा प्रश्न माझ्या मनात आला. तेव्हा देवाने मला सुचवले, ‘सद्गुरु काकांनी मला आलिंगन दिल्यावर मी त्यांना सूक्ष्मातून माझ्या साधनेची स्थिती सांगितल्याने माझ्या मनावरील ताण दूर झाला अन् माझे मन मोकळे झाले. त्यामुळे माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर झाले आणि माझी भावजागृती होऊन मी सद्गदित झालो.’
‘अशा प्रकारे सलग ३ दिवस पहाटे विशिष्ट वेळी पडलेल्या स्वप्नांचा अर्थ देवाने मला सकाळी उठल्यानंतर उलगडून दाखवला आणि माझ्या साधनेला दिशा दिली’, याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा. (१.७.२०२२)
|