संपादकीय : असदुद्दीन ओवैसींना कट्टर आव्हान !
सनातन धर्माच्या विरोधात आक्रमक असलेल्या धर्मांध आणि हिंदुद्वेषी ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कुटुंबाचा ४० वर्षांचा राजकीय बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी भाजपने भाग्यनगर (हैद्राबाद) येथील लोकसभा मतदारसंघातून डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. माधवी यांना हिंदुत्वाचा कट्टर चेहरा मानला जातो. डॉ. माधवी या कट्टर हिंदु असूनही मदरशांना साहाय्य करतात. ‘मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नसून सनातन धर्माच्या विरोधात अनावश्यक वक्तव्ये करणार्यांना खपवून घेतले जाणार नाही’, असे त्या सांगतात. प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या डॉ. माधवी यांना विश्वास आहे की, सनातन धर्माचे रक्षण करण्याचे भाजपने त्यांना दिलेले काम त्या कोणत्याही अडचणींखेरीज पूर्ण करतील. राजकारणात त्या नवीन असल्या आणि त्यांची ही पहिलीच निवडणूक असली, तरी भाग्यनगरमध्ये त्या ओवैसींना कडवे आव्हान देणार आहेत. ‘आयबी’ला मिळालेल्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने डॉ. माधवी यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दिली आहे.
धारदार युक्तीवाद !
डॉ. माधवी लता या ४९ वर्षांच्या असून त्या भाग्यनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील ‘लष्करी अभियांत्रिकी सेवे’च्या भांडार कक्षाचे प्रभारी होते. डॉ. माधवी या उत्तम वक्त्याही मानल्या जातात. डॉ. माधवी यांनी भाग्यनगर येथील निजाम महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे शिक्षण एम्.ए.पर्यंत झाले आहे. त्यांनी भरतनाट्यम् नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना चित्रकलेची आवड आहे. समाजसेवेतही त्या सक्रीय आहेत. त्या भजनेही गातात. त्या ‘विंरिंची’ नावाचे रुग्णालयही चालवतात. त्या त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ भूमिकेमुळे सामाजिक माध्यमांवर चर्चेत असतात. त्यांचा हिंदुत्वाविषयीचा धारदार युक्तीवाद आणि धाडसी शैली यांद्वारे त्या दिग्गजांची बोलती बंद करतात. ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डॉ. माधवी म्हणाल्या, ‘शालेय पद्धतीचे पुष्कळ व्यापारीकरण झाले आहे. शाळेत जातांना तुम्हाला इन्स्टाग्राम आणि अमली पदार्थ मिळतात. माझी मुले असे करणार नाहीत, असे मला वाटले. प्रथम मुलाला माणूस बनायला शिकवा.’ डॉ. माधवी या त्यांच्या विविध मुलाखतींमध्ये धर्माविषयी खुलेपणाने बोलतांना दिसतात. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, मुसलमान मतदार त्यांना निवडून देतील का ? यावर त्या म्हणाल्या, ‘मुसलमान आम्हाला समान मते देतील; पण आम्ही मते मिळवण्यासाठी काम करत नाही. ज्यांना विकास हवा आहे, ते मुसलमान मतदान करतील. भाग्यनगरचे राजकारण इतके धर्मनिरपेक्ष आहे की, गरीब मुसलमान हिंदूंच्या इतकेच गरीब आहेत.’
असदुद्दीन ओवैसींची अस्वस्थता !
खासदार असदुद्दीन ओवैसी हे आतापर्यंत ४ वेळा भाग्यनगर येथून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात डॉ. माधवी लता यांचे नाव घोषित झाल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. देशवासियांसाठी त्या नवख्या असल्या, तरी ओवैसी यांच्या गडात जाऊन त्या काही वर्षे काम करत आहेत. त्या शिक्षिका, गायिका, समाजसेविका आहेत. त्यांचे वक्तृत्व चांगले आहे, हिंदी भाषेतही त्यांचे संभाषण कौशल्य चांगले आहे. मोदी यांनी ‘आप की अदालत’मधील त्यांच्या मुलाखतीची प्रशंसा केली आहे. या कार्यक्रमात डॉ. माधवी लता यांचा उल्लेख ‘अग्नीसुता’ असा करण्यात आला. द्रौपदीला ‘अग्नीसुता’ म्हणतात. प्रारंभी ‘तिहेरी तलाक’ या सूत्रावर डॉ. माधवी यांनी भाग्यनगर येथे मुसलसान महिलांना मार्गदर्शन केले, तेव्हा त्या प्रकाशझोतात आल्या. ओवैसी यांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. तिथल्या मुसलमानांना चांगले शिक्षण मिळत नाही, यासाठी त्यांनी आवाज उठवला आहे. स्थानिकांना धान्य मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. हिंदूंवर होणार्या अन्यायावरही त्या उघडपणे बोलतात. त्याचसमवेत त्यांनी ओवैसी यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. भ्रष्टाचारापासून स्थानिक मशिदी तोडण्यापर्यंत त्यांनी ओवैसींना धारेवर धरले आहे. ‘भाग्यनगरमधील मुसलमान मुलींना विकले जाते’, असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.
हिंदूंनी संघटित होणे महत्त्वाचे !
भाग्यनगरमध्ये जवळजवळ ४३ टक्के मुसलमान आहेत. साधारण ५० टक्के हिंदु आणि ७ टक्के अन्य पंथीय आहेत. उत्तर भारतात भाजपने ‘पासमंदा स्नेह यात्रा’ काढली. ‘पासमंदा’ मुसलमान समाज हा मागासलेला समाज मानला जातो. इस्लाम हा मुसलमानांना बांधणारा समान धागा असू शकत नाही. असे असते, तर बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला नसता. पाकमध्ये पंजाबी मुसलमानांवर इतर मुसलमानांचा राग नसता, तर भारतात पासमंदा समाज हा मागासलेला मुसलमान समाज राहिला नसता. पूर्वी मुसलमानांची मते काँग्रेसला जायची; पण उत्तर भारतातील मुसलमानबहुल भागातही हिंदु नेते जिंकले आहेत. हा चमत्कार मुसलमान महिलांनी घडवून आणला आहे. हा समाज सत्ताधारी मुसलमान समाजावर अप्रसन्न आहे. या समाजाला सत्ता आणि इतर सर्व सोयी-सुविधांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पासमंदा मुसलमान ही एक नवीन चळवळ निर्माण होत आहे. डॉ. माधवी लता ज्या समाजासाठी झटत आहेत, तो पासमंदा मुसलमान समाज आहे. डॉ. माधवी यांच्यासाठी ही लोकसभेची लढत सोपी नाही. त्यांना ओवैसी यांच्यापेक्षा जवळजवळ ३० टक्के अधिक मते हवी आहेत; पण त्यांच्यामुळे ओवैसी अस्वस्थ झाले आहेत. डॉ. माधवी यांच्या रूपाने तेलंगाणामध्ये भाजपला एक सक्षम नेतृत्व मिळू शकते. जर त्या जिंकल्या, तर वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या त्या नायिका ठरतील आणि हरल्या, तरी दक्षिण भारतातील तेलंगाणा राज्यात भाजपला नवे सक्षम नेतृत्व मिळेल. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. माधवी लता म्हणाल्या, ‘ओवैसी लोकसभेत अल्पसंख्यांकांचे प्रश्न उपस्थित करतात; परंतु त्यांच्या मतदारसंघात हिंदु अल्पसंख्यांक आहेत, हे ठाऊक असूनही त्यांनी कधी अल्पसंख्यांक हिंदूंसाठी आवाज उठवला आहे का ? माझे हिंदु बंधू आणि भगिनी जागृत होऊन संघटित झाले, तर ओवैसी भावांसाठी ते पुष्कळ अवघड होऊन बसेल. मी धर्माच्या आधारावर नव्हे, तर विकासावर काम करते. मी महिलांच्या कल्याणासाठी काम करीन.’ उमेदवारी मिळाल्यानंतर डॉ. माधवी यांनी असा दावाही केला होता, ‘ओवैसींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात दीड लाख मतांनी पराभूत केल्यानंतर त्या त्यांना संसदेतून हाकलून देतील आणि लोकशाहीच्या मंदिरात भाग्यनगरचे प्रतिनिधित्व करायला जातील.’ ओवैसी हे आजवर फसवणूक करून जिंकत आले आहेत. या वेळी त्यांची बनावट मतपेटी (व्होट बँक) चालणार नाही, हे निश्चित !
हिंदू संघटित झाल्यास देशभरातील निधर्मी आणि हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना मतपेटीच्या माध्यमातून कायमचे हद्दपार करू शकतात ! |