मूर्तीकारांची पाहुनी भक्ती, लाभली प्रभु रामरायांची प्रीती !
मूर्तीकारांची पाहुनी भक्ती,
लाभली प्रभु रामरायांची प्रीती !
भक्तीरसपूर्ण श्रीरामाची मूर्ती ।
विलोभनीय असे सुंदर
कलाकृती ।। १ ।।
श्री रामलल्लाची सुंदर मूर्ती ।
दिव्यत्वाची देते प्रचीती ।। २ ।।
योगीराजांनी घडवली सुंदर मूर्ती ।
काय वर्णावी तयांची कीर्ती ।। ३ ।।
भावभक्तीच्या संगमावरती ।
सुंदर साकारली श्रीरामप्रभूंची मूर्ती ।। ४ ।।
मूर्तीकारांची पाहुनी भक्ती ।
लाभली प्रभु रामरायांची प्रीती ।। ५ ।।
प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावरती ।
जणु स्वर्ग अवतरला या धरतीवरती ।। ६ ।।
अवकाशातून अवतरल्या तेजोमय ज्योती ।
करण्या प्रभु श्रीरामांची दिव्य आरती ।। ७ ।।
प्रभु श्रीरामांची करूनी भावमय आरती ।
कृतज्ञता सुमने प्रभुचरणी अर्पिती ।। ८ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले