इराणच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याचा इस्रायलचा एकमुखी निर्णय !
|
तेल अवीव (इस्रायल) – इराणने १३ एप्रिलला केलेल्या हवाई आक्रमणानंतर इस्रायल त्याचा सूड घेणार, असे बोलले जात असतांना इस्रायलच्या युद्ध मंत्रीमंडळाची दुसर्याच दिवशी बैठक झाली. त्यामध्ये आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याच्या निर्णयावर एकमत झाले असून युद्ध कसे आणि केव्हा होईल, हे अद्याप ठरलेले नाही, अशी माहिती ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिली आहे.
सौजन्य ET NOW
इराणच्या सैन्याने १३ एप्रिलला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता अनुमाने ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांनी इस्रायलवर आक्रमण केले. इस्रायलने ९९ टक्के ड्रोन-क्षेपणास्त्रे थांबवली. या आक्रमणात इस्रायलच्या ‘नेवाटीम एअर फोर्स’ तळाचीच थोडी हानी झाली आहे. इराणने इस्रायलवरील या आक्रमणाला ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’ असे नाव दिले आहे. १ एप्रिल या दिवशी इस्रायलने सीरियातील इराणी दूतावासाजवळ हवाई आक्रमण केले होते. यामध्ये इराणच्या दोन सर्वोच्च सैनिकी कमांडर्ससह ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’चे ७ कर्मचारी मारले गेले होते. यानंतर इराणने सूड म्हणून इस्रायलवर आक्रमण करण्याची धमकी दिली होती.
भारत आणि इराण यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट
इस्रायलवर आक्रमण करतांना इराणने एका इस्रायली अब्जाधिशाच्या आस्थापनाची नौकाही कह्यात घेतली होती. ही मालवाहू नौका भारतात येत होती आणि त्यात १७ भारतीय कर्मचारी होते. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी इराणमध्ये कैदेत असलेल्या १७ भारतियांच्या सुटकेसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांच्याशी चर्चा केली. डॉ. जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांनी शांतता आणि मुत्सद्देगिरी यांनी प्रश्न सोडवला पाहिजे. तेहरान लवकरच भारतीय अधिकार्यांना त्यांना भेटण्याची होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अनुमती देईल.