शाळकरी मुलाला मारहाण करून विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद !
पुणे – डेक्कन जिमखाना परिसरात नदीपात्रात १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण केली, तसेच त्याची विवस्त्रावस्थेतील चित्रफीत सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी अन्सू शर्मा याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. याविषयी १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता. महिलेच्या मुलाने मारहाण करण्यास काही जणांना पाठवल्याच्या गैरसमजातून शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी १६ वर्षीय मुलाला डेक्कन परिसरातील नदीपात्रात नेले. तेथे त्याला विवस्त्र करून पट्टा आणि बांबू यांनी मारहाण केली. तसेच भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण करून सामाजिक माध्यमांत चित्रफीत प्रसारित केली. आमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिल्यास समाजाच्या समुहावर चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी आरोपींनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा डेक्कन पोलीस शोध घेत आहेत.