दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी अस्वच्छ हौदाची स्थिती उघड करताच स्वयंसेवकांकडून तात्काळ स्वच्छता !
पंढरपूर, १४ एप्रिल (वार्ता.) – चंद्रभागेच्या तीरावर वारकर्यांना पिण्यासाठी हौद ठेवले असून त्यांना हात धुण्यासाठी, तसेच ताटे धुण्यासाठी अन्य एक हौद ठेवण्यात आला आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर जेव्हा नदीच्या काठावर नदीची स्थिती, तसेच अन्य पहाणी करत होते, तेव्हा त्यांना वारकर्यांना ताटे धुण्यासाठी असलेल्या हौदात शेवाळ असल्याचे, तसेच त्या हौदात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांची याची छायाचित्रे काढली, तसेच याचे चित्रीकरण केले. हे पाहून तेथे असलेल्या स्वयंसेवकांनी तात्काळ याची नोंद घेऊन हौदातील पाणी लगेच सोडून दिले.
येथे वारकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जो हौद ठेवला होता, तोही स्वच्छ नव्हता, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. खरे पहाता सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर पवित्र तीर्थ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र ती आढळून आली नाही. या अस्वच्छतेमुळे वारकर्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. या संदर्भातील तेथील स्वयंसेवक कर्मचारी म्हणाले, ‘‘नगरपालिकेचे कर्मचारी, तसेच मंदिर समितीचे कर्मचारी कधी कधी येऊन येथे स्वच्छता करतात; मात्र आम्हीच येथील परिसराची देखभाल करतो.’’
चंद्रभागा नदीच्या काठावर उसाच्या रसाची दुकाने, छायाचित्रे काढणे, खाद्यपदार्थ, भिकारी, तसेच अनेकांचे अतिक्रमण झालेले आढळून आले. यामुळेही नदीकाठ अस्वच्छ होता; मात्र या संदर्भात नगरपालिका प्रशासन ‘नरो वा कुंजरोवा’च्या भूमिकेत दिसले. (या अस्वच्छतेला आणि गलथान कारभाराला उत्तरदायी असणार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)