परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे आणि भावाच्या संपूर्ण आजारपणाच्या कालावधीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !
१३ एप्रिल या दिवशी या लेखाचा काही भाग आपण पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.
या लेखाचा या पूर्वीचा भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/783642.html
८. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील प्रचंड चैतन्यामुळे वाईट शक्तीचा पराभव झाल्यामुळे पूर्वी उपचारासाठी येण्यास सिद्ध नसलेला भाऊ रुग्णालयात येणे
बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे माझा भाऊ उपचारांसाठी मानसोपचार तज्ञांकडे येत नव्हता. तेव्हा आम्ही प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून त्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत लावून ठेवली. भावाला त्रास देणारी वाईट शक्ती त्याला मानसोपचार तज्ञांकडे जाऊ देत नव्हती; मात्र प.पू. गुरुदेवांच्या वाणीतील प्रचंड चैतन्यामुळे शेवटी भाऊ आमच्या समवेत रुग्णालयात आला. पहिल्या भेटीत त्या तज्ञांनी त्याला ३ दिवसांचे औषध देऊन परत दुसर्या तपासणीसाठी यायला सांगितले.
९. भाऊ मानसोपचार तज्ञांना भेटायला न येता चिडचिड करू लागल्यावर आकाशात घिरट्या घालणारा गरुड दिसणे, त्यामुळे ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊली समवेत असल्याने काळजीचे काही कारण नाही’, या विचाराने भावजागृती होणे
त्या ३ दिवसांत आम्ही नामजपाच्या मंडलामध्ये त्रास लिहिणे, नामजप करणे आणि प्रामुख्याने प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन भ्रमणभाषवर लावून ठेवणे यांसारखे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत होतो; परंतु माझ्या भावाला होणार्या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढतच होती. प्रत्यक्षात माझ्या भावात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आहे. त्या सुप्तावस्थेतील भक्तीभावाची त्याला जाणीव करून देऊन ‘आध्यात्मिक त्रासाविरुद्ध लढायला हवे’, असे आम्ही त्याला परत परत सांगायचो. ३ दिवसांनंतर भावाच्या दुसर्या तपासणीसाठी पुन्हा रुग्णालयात जायचे होते. त्याच्या जरा आधी त्याचा त्रास पुष्कळ वाढल्याने तो मानसोपचार तज्ञांकडे जायला सिद्ध होत नव्हता. आम्ही सर्वांनी अत्यंत शरणागतभावाने परम पूज्यांना प्रार्थना केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत लावली. त्यानंतर माझा भाऊ सावकाशपणे चारचाकीत येऊन बसला; मात्र रुग्णालयात पोचल्यावर तो मानसोपचार तज्ञांना भेटायला तयार नव्हता. आम्ही रुग्णालयात जातांना आमच्या चारचाकीसमोर आकाशात एक गरुड एकसारखा घिरट्या घालतांना मला दिसला. रुग्णालयात पोचल्यावर आम्हाला पुष्कळ माेरांच्या एकत्रित ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ते ऐकून ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊली आमच्या समवेत असल्यामुळे काळजीचे काही कारण नाही’, या विचाराने माझी भावजागृती झाली.
१०. भावाची स्थिती पाहून काळजी वाटणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनीफितीत त्यांनी सांगितलेली कथा आठवणे
माझ्या भावाची स्थिती पाहून आम्हाला पुष्कळ काळजी वाटू लागली. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनीफितीत त्यांनी सांगितलेली एक कथा मला आठवली. ती कथा अशी होती, ‘एक शिष्य त्याच्या गुरूंची अंतःकरणपूर्वक सेवा करत असतो. त्याच्या सेवेने गुरु प्रसन्न होऊन त्याला सांगतात, ‘तुझे केवळ एकच प्रारब्ध शिल्लक आहे आणि ते म्हणजे विवाह करणे. त्यानंतर तुला मोक्ष मिळेल.’ ते ऐकून शिष्य म्हणतो, ‘‘गुर्वाज्ञा म्हणून मी विवाह करीन; मात्र मला तुमच्या चरणांपाशी परत यायचे आहे.’’ त्यावर गुरु म्हणतात, ‘‘तुला पहिले अपत्य झाल्यानंतर माझ्याकडे परत ये.’’ त्यानुसार तो शिष्य विवाह करून त्याच्या पत्नीच्या समवेत एका जंगलात राहू लागतो. काही वर्षांनी त्याच्या पत्नीला गर्भधारणा होते. दिवस पूर्ण झाल्यावर पत्नीला प्रसववेदना चालू होतात. तो शिष्य झोपडीच्या बाहेर थांबून बाळाच्या जन्माची वाट पहात असतो. त्याच्या मनात एकच विचार असतो, ‘बाळ जन्माला आले की, गुरूंकडे परत जायचे.’ काही वेळाने त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो; पण पत्नीचा आवाज न आल्याने तो दार उघडून आत जाऊन पहातो, तर त्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला असतो. नुकतेच जन्माला आलेले बाळ रडत असते. त्या बाळाला पाहून त्याचे मन विचलित होते. ‘मी येथून निघून गेलो, तर या लहानशा जिवाला जंगलातील प्राणी खाऊन टाकतील’, असे त्याला वाटू लागते. त्याच वेळी त्याचे लक्ष अंगणातील एका झाडाकडे जाते. त्या झाडावर एक चिमणी स्वतःच्या लहान पिल्लांना खायला आलेल्या गिधाडापासून वाचवण्यासाठी त्याच्याशी झटापट करत असते. त्या झटापटीत घरट्यातील पिल्ले खाली पडतात; मात्र ती भूमीवर न पडता मऊ गवतावर पडतात. हे दृश्य पाहून ‘ज्या ईश्वराने त्या लहान पिल्लांचे रक्षण केले, तो माझ्या बाळाचे रक्षण करणार नाही का ? माझ्या बाळाच्या प्रारब्धात मृत्यू असेल, तर तो टळणार नाही आणि त्याच्या प्रारब्धात जीवन असेल, तर देव त्याच्या प्राणाचे रक्षण करीलच’, असा विचार करून तो शिष्य त्याच्या गुरूंकडे निघून जातो.’ मला ही कथा आठवली आणि त्याच वेळी माझ्या समोर एक लहानसा पक्षी मऊ गवतावर पडला. ते दृश्य पाहिल्यावर परम पूज्य गुरुदेवांनी हा प्रसंग घडवून ‘सर्वकाही ठीक होणार आहे. मी आहे, काळजी करू नकोस’, असे सांगून मला आश्वस्त केल्याचे जाणवले.’
११. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत अखंड लावून ठेवल्यामुळे अकस्मात् भाऊ भ्रमिष्टावस्थेतून बाहेर आल्याप्रमाणे शुद्धीवर येणे
त्या मानसोपचार तज्ञांना येण्यास काही अवधी असल्यामुळे मी आणि माझी वहिनी रुग्णालयात जाऊन त्यांची वाट पहात बसलो. माझा भाऊ आत येण्यास सिद्ध नसल्याने त्याच्या समवेत माझे यजमान थांबले. अकस्मात् माझा भाऊ भ्रमिष्टावस्थेतून बाहेर आल्याप्रमाणे शुद्धीवर आला आणि माझ्या यजमानांशी पुष्कळ वेळ मनमोकळेपणाने बोलला. त्याने त्यांना रुग्णालयात येण्याचे कारण विचारले. तेव्हा यजमानांनी ‘त्रासामुळे निर्माण झालेल्या मानसिक आजाराच्या उपचारासाठी येथे आलो आहोत’, असे त्याला सांगितले.
१२. मानसोपचार तज्ञांनी ‘भावाचा आजार पूर्णपणे गेला असून तो पूर्वीप्रमाणे दैनंदिन जीवन चालू करू शकतो’, असे सांगितल्यावर परम पूज्यांची छत्रछाया आणि अपार प्रीती यांमुळे सर्वकाही शक्य झाल्याचे जाणवून कृतज्ञता वाटणे
त्यानंतर माझा भाऊ मानसोपचार तज्ञांना भेटला. त्या तज्ञांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुमचा भाऊ ७० टक्के चांगला झाला असून त्याचा आजार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे चाकरीला जाणे इत्यादी दैनंदिन जीवन चालू करू शकतो.’’ त्या वेळी आम्ही संपूर्णपणे शरणागती आणि कृतज्ञतेच्या भावात होतो. परम पूज्यांच्या या कृपावर्षावाने आम्ही अचंबित होऊन गेलो. परम पूज्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत ऐकणे आणि संतांनी सांगितलेले नामजप करणे या उपायांमुळे माझा भाऊ केवळ ३ दिवसांत बरा झाला. देहली येथे आल्यावर त्या वेळेची भावाची अवस्था पाहून आम्हाला ‘तो बरा होण्यास पुष्कळ कालावधी लागेल’, असे वाटले होते, तसेच ‘काय आणि कसे करायचे ?’, या विचाराने आम्ही संभ्रमित होऊन गेलो होतो; मात्र परम पूज्यांची छत्रछाया आणि अपार प्रीती यांमुळे सर्वकाही शक्य झाले.
१३. भावाचे रक्षण होऊन त्याने साधनेला आरंभ करण्यासाठीच हे दैवी नियोजन घडलेे असल्याचे जाणवणे
या अनुभूतीनंतर माझ्या भावाचा परम पूज्य गुरुदेवांच्या प्रती असलेला भाव जागृत झाला. साधनेच्या अंतर्गत नामजप, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् आध्यात्मिक उपाय करणार असल्याचे त्याने आम्हाला सांगितले. या प्रसंगाच्या माध्यमातून देवाने मला भाऊ आणि त्याचे कुटुंबीय यांना साधनेविषयी सांगण्याची एक लहानशी संधी उपलब्ध करून दिली. खरे तर हा प्रसंग, म्हणजे माझा भाऊ आणि त्याचे कुटुंबीय यांचे रक्षण करून घोर आपत्काळापूर्वी त्यांनी साधनेला आरंभ करण्यासाठी घडवलेले जणू दैवी नियोजन होते.
१४. कृतज्ञतापूर्वक केलेली प्रार्थना !
प.पू. डॉक्टरांनी आमच्यासाठी जे काही केले आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला आमच्याकडे शब्द नाहीत. त्यांची प्रीतीमय वाणी ही संजीवनी आहे. सतत साहाय्य करणारा साधक परिवार हे एक सुंदर सत्य आहे. परम पूज्यांकडे माझी एकच प्रार्थना आहे, ‘काहीही झाले, तरी आम्हाला आपल्या पवित्र चरणांपाशी रहाता येऊ देत. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अहोरात्र अखंड साधना करता येऊ दे.’
‘परम पूज्य आमच्या जीवनात असणे, ही आमच्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे’, हेसुद्धा समजण्याची आमची क्षमता नाही.’ (समाप्त)
– गुरुदेवांच्या पवित्र चरणी समर्पित
एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.