वेंगरुळ (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’ येथे भारतीय व्यायामप्रकार शिकायला गेल्यावर सनातनच्या साधकांना शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
‘वेंगरूळ (ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथे श्री. लखन जाधव (गुरुजी) त्यांच्या काही सहकार्यांच्या समवेत ‘सव्यसाची गुरुकुलम्’ नावाचे गुरुकुल चालवतात. ‘सव्यासाची गुरुकुला’त शिवकालीन युद्धकला शिकवली जाते, तसेच शरीर सौष्ठवासाठी प्राचीन भारतीय व्यायामपद्धतींचा अवलंब केला जातो. ‘२.२.२०२४ ते ११.२.२०२४ या कालावधीत सनातनचे साधक भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञा सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे तिथे काही प्राचीन भारतीय व्यायामपद्धती शिकायला गेलो होतो. तिथे गेल्यावर आम्हाला ‘सव्यासाची गुरुकुलम्’ची जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि तिथे शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग १)
१. ‘सव्यसाची गुरुकुलम्’ स्थापनेचा उद्देश !
१ अ. गुरुकुलांनी स्वतःचे संरक्षण करण्याची कुठलीही सिद्धता केली नसल्यामुळे भारतातील शास्त्रसंपन्न गुरुकुले नष्ट होणे : ‘मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत ही मनुष्याची प्रगती करणारी नसून केवळ कारकून निर्माण करणारी शिक्षणपद्धत आहे’, हे आता बर्यापैकी सर्वांना ठाऊक झाले आहे; याउलट पूर्वीची गुरुकुलपद्धत श्रेष्ठ आणि प्रगल्भ शिक्षणपद्धत होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात ७ लक्ष ३२ सहस्र गुरुकुले, तर ३ ते ४ सहस्र विश्वविद्यालये होती; पण ती नष्ट होण्याचे एक मुख्य कारण, म्हणजे त्यांनी स्वतःचे संरक्षण करण्याची कुठलीही यंत्रणा किंवा सिद्धता केली नव्हती.
१ आ. शास्त्रासहित शस्त्रांचेही प्रशिक्षण देऊन सर्व दृष्टीने सक्षम असे आचार्य निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणारा तरुणवर्ग सिद्ध करणे : पूर्वीच्या काळच्या ज्ञानाचे अध्ययन करून आताही आपण शास्त्रासहित शस्त्रांचेही प्रशिक्षण देऊन सर्व दृष्टीने सक्षम असे आचार्य निर्माण करू शकतो. आचार्य सिद्ध झाल्यावर ते अन्य गुरुकुलात (शाळेत) जाऊन तेथील विद्यार्थ्यांनाही स्वयंपूर्ण बनवण्याचे कार्य करतील. परिणामी कुठलेही गुरुकुल, आश्रम किंवा आध्यात्मिक संस्था यांना संरक्षणासाठी बाह्य यंत्रणेवर अवलंबून रहावे लागणार नाही. हे साध्य करण्यासाठी वैयक्तिक जीवन, भावना इत्यादी बाजूला ठेवून केवळ धर्म आणि राष्ट्र यांच्या कार्यासाठी वाहून घेतलेली फळी सिद्ध करण्याची प्रक्रिया ‘सव्यास’ गुरुकुलात चालू आहे.
१ इ. ‘सव्यसाची’चा अर्थ : ‘सव्यसाची’ हे अर्जुनाला संबोधले गेलेले एक विशेषण आहे. ‘सव्यसाची’ या शब्दाचे २ अर्थ आहेत.
१. उजव्या आणि डाव्या दोन्ही अंगांनी एकसारख्याच प्राविण्याने कार्य करू शकणारा मनुष्य !
किंवा
२. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये पारंगत होऊन त्या माध्यमातून धर्मकार्य करणारा मनुष्य !
वर्ष २०१४ मध्ये श्री. लखन जाधव (गुरुजी) यांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही विद्या आत्मसात् करणारे आचार्य निर्मितीचे कार्य करण्यासाठी ‘सव्यसाची गुरुकुलम्’ची स्थापना करण्याचे ठरवले.
श्री. लखन जाधव यांचा परिचय
श्री. लखन जाधव (गुरुजी) हे कोल्हापूर येथे रहाणारे असून, त्यांनी बी.पी.एड्. (Bachelor in Physical Education) आणि इतिहास विषयात ‘एम्.ए.’ (कला शाखेची पदव्युत्तर पदवी) केले आहे. त्यांना लहानपणापासूनच मर्दानी खेळांमध्ये फार रुची होती. त्यांनी इयत्ता ४ थीमध्ये असल्यापासूनच मर्दानी खेळांचा सराव चालू केला. या अंतर्गत लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा, भाला लढत यांसारख्या अनेक शिवकालीन शस्त्रविद्येमध्ये त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. त्यांनी दांडपट्ट्याने ४६ मिनिटांमध्ये ३,८०२ लिंबू कापण्याचा (शस्त्रविद्येच्या भाषेत ‘पट्टकाप’) विश्वविक्रम केला आहे.
श्री. लखनगुरुजी यांनी ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या मागदर्शनाखाली कार्य चालू केले आणि पुणे येथील पू. संजय गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केली. श्री. लखनगुरुजींनी ‘सव्यसाची गुरुकुलम्’ची स्थापना केली आहे. ते त्यांच्या विद्यार्थ्यांसह हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी होतात.
२. ‘प्राचीन भारतीय विद्या शिकवणार्या गुरुकुलाची स्थापना करणे, हे धर्मकार्य आहे, त्यामुळे देव काळजी घेईल’, असे २ संतांनी सांगणे
गुरुकुल स्थापनेचा विचार आला, तेव्हा श्री. लखनगुरुजींकडे मोजकेच पैसे होते. त्यांच्या मनात आले, ‘भारतीय विद्या शिकवणार्या गुरुकुलाचे बांधकाम प्रशस्त असायला हवे; पण एवढ्या अल्प निधीमध्ये ते करणे शक्य नाही; म्हणून प्रथम केवळ पत्र्याचे एक छप्पर उभे करून कार्य चालू करावे. निधी मिळाल्यावर चांगले बांधकाम करावे.’ याविषयी त्यांनी पू. भिडेगुरुजी आणि पू. संजय गोडबोले यांना विचारले. ते दोघेही म्हणाले, ‘हे धर्मकार्य असल्याने तू पैशाची चिंता न करता कार्य करत रहा. बाकी देव बघेल.’ दोन संतांचे हे बोलणे ऐकल्यावर लखनगुरुजींच्या मनातील सर्व चिंता दूर झाली आणि त्यांनी गुरुकुलाचे बांधकाम चालू केले.
३. सहकारी मित्र आणि काही जवळचे लोक यांच्या श्रमदानातून गुरुकुलाचे बांधकाम करणे
श्री. लखनगुरुजींनी उपलब्ध असलेल्या निधीतून टप्प्याटप्याने बांधकाम केले. बांधकामासाठी बाहेरील तज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने त्यांनी त्यांचे २५ – ३० मित्र आणि जवळच्या लोकांना घेऊन बांधकाम चालू केले. तेव्हा तिथे पाणी आणि वीज नव्हती. थोडे दूर असलेल्या तलावातून पायी जाऊन पाणी आणावे लागत असे. या स्थितीतही त्यांनी दिवसाचे १६ – १८ घंटे श्रमदान (शारीरिक सेवा) करत, टप्प्याटप्प्याने गुरुकुलाचे बांधकाम केले. आता गुरुकुलाची एकूण ३ बैठी घरे बांधून झाली असून, त्यामध्ये २ निवासी कक्ष, आखाडा, गोठा आणि तबेला आहे. वर्ष २०२२ मध्ये येथे पाणी आणि वीज आली. त्यामुळे वर्ष २०२२ पासून तिथे शिक्षणासाठी अनेक मुला-मुलींना प्रवेश देऊन गुरुकुलात ठेवणे शक्य झाले.
पू. भिडेगुरुजी आणि पू. संजय गोडबोले या २ संतांनी सांगितल्याप्रमाणे लखनगुरुजींचे पैशांवाचून काही अडले नाही. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत मला कशाचीच न्यूनता भासली नाही. देव काळजी घेत आहे’, याची मी आजही अनुभूती घेत आहे.’’
४. गुरुकुलाची रचना
अ. गुरुकुलात मध्यावर पडवी असून त्यामध्येच आखाडाही आहे. हीच गुरुकुलाची सर्वांत जुनी आणि मुख्य बैठी इमारत आहे. पाहुणे आणि नवीन शिबिरार्थी यांचे येथे मंत्रोच्चारणसह औक्षण करून स्वागत केले जाते.
आ. एका बाजूला विद्यार्थ्यांचे निवासीकक्ष आहेत. मुला-मुलींचे वेगवेगळे; पण सामूहिक कक्ष आहेत.
इ. दुसरीकडे भोजनकक्ष, स्वयंपाकघर आणि आचार्यांचे कक्ष आहेत. बहुतेक बांधकामांच्या भूमी आणि भिंती शेणाने सारवलेल्या आहेत.
ई. व्यायाम आणि सराव यांसाठी ३ मैदाने आहेत. त्यातील एका मैदानाजवळ ३ गायींचा एक गोठा आणि ४ घोड्यांचा एक तबेला आहे. एका लहान मैदानात शस्त्रकलेचे सादरीकरण केले जाते. तिथे विविध देवतांची अनेक शिल्पे आहेत. प्रत्येक देवतेचे त्याच्या शस्त्रासहित मारक रूप (उदा. त्रिशूळाने वार करतांना शिव, धनुष्यबाण वापरतांना श्रीराम इत्यादी) आहे. (टीप १)
(टीप १ : देवतांच्या या मूर्तींविषयी सांगतांना श्री. लखनगुरुजी म्हणाले, ‘‘या मारक रूपातून देवतांचे वैशिष्ट्य शिकता येते. देवाने असे मारक रूप धारण केल्यावर, त्याच्यासमोर कुठलाही शत्रू कधी टिकू शकला नाही; पण तरीही कुठल्याही देवतेच्या चेहर्यावर राग किंवा क्रौर्य दिसत नाही. मारकरूपातही त्या देवता मनाने शांत आणि प्रसन्न आहेत. आपल्याला त्यांच्यासारखे घडायचे आहे. भारतात युद्धामध्ये वीरता, शूरता, चातुर्य यांचा पुरस्कार केला आहे. त्यात कधीही क्रौर्य जोपासलेले नाही; पण पाश्चात्त्य आक्रमणकर्त्यांमध्ये क्रौर्य दिसून येते.’’)
उ. गुरुकुल शहरापासून दूर असल्याने आजूबाजूला सगळीकडे शेती आहे. गुरुकुलाला कुंपण घातलेले नाही. त्यामुळे रात्री कोल्हे, गवा (Bison) असे हिंस्त्र प्राणी येण्याचीही शक्यता असते. अशा स्थितीतही सर्व विद्यार्थी तिथे न घाबरता वावरतात.
५. गुरुकुलातील विद्यार्थ्यांची दिनचर्या
तेथील विद्यार्थ्यांची दिनचर्या आताच्या इतर मुलांपेक्षा पुष्कळ भिन्न आणि प्रेरक आहे. सर्व जण पहाटे ४ – ४.३० वाजता उठतात. स्वतःचे मुखमार्जनादी आवरून संगीताचा सराव करतात. त्यानंतर त्राटक करून अनुमाने ५.३० ते ८.१५ वाजेपर्यंत व्यायामप्रकार आणि सराव करतात. त्यानंतर थोडे पौष्टिक कढण, मसाला दूध आणि शिजवलेले कडधान्य असा अल्पाहार घेतात. सकाळी ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे स्नान करणे, कपडे धुणे इत्यादी झाल्यावर लखनगुरुजी प्रवचन (ग्रंथवाचन – ‘वाल्मीकि रामायण’सारख्या एका ग्रंथातील एका अध्यायाचे वाचन) करतात. १० ते १०.३० पर्यंत प्रवचन झाल्यावर आरती होते. मग महाप्रसाद असतो. त्यानंतर दुपारी शालेय वर्ग किंवा श्रमदान असते. दुपारी १ ते २ पर्यंत विश्रांती घेऊन पुन्हा शालेयवर्ग किंवा श्रमदान होते. सायंकाळी ४ वाजता थोडा अल्पाहार असतो. त्यामध्ये सुकामेवा आणि एखादे फळ असते. त्यानंतर सायंकाळी ७.३० – ८ वाजेपर्यंत श्रमदान अन् व्यायाम असतो. ८.३० ते ९.३० मध्ये रात्रीचे जेवण असते. स्वयंपाक करणारे यांच्यापैकीच असून ते स्वयंपाक करतांना ‘श्रीकृष्णं शरणम् मम् ।’ असा नामजप करतात.
५ अ. शनिवारच्या दिवसाचे वेगळेपण ! : प्रत्येक शनिवारी सर्व विद्यार्थ्यांंसाठी थोडी विश्रांती असते. त्या दिवशी मुले पहाटे ४ वाजता न उठता सकाळी ६ वाजता उठतात. शनिवारी रात्री मुले ते शिकलेल्या कलांचे सादरीकरण करतात, उदा. गायनसेवा, वेगवेगळी वाद्ये वाजवणे, नाटक करणे; मात्र यातील विषय देव, देश आणि धर्म यांच्याशी निगडीत असतात.
(क्रमशः)
– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञा सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे, फोंडा, गोवा. (१.३.२०२४)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/784555.html