राज्यभरात सध्या २ सहस्र ९३ टँकरनी पाणीपुरवठा चालू !
मुंबई – राज्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होऊ लागला आहे. टँकरने राज्यातील विविध गावे आणि वाड्या यांमध्ये चालू असलेल्या पाणीपुरवठ्याचा अहवालही राज्य सरकारने घोषित केला. १२ एप्रिलपर्यंत एकूण १ सहस्र ६६५ गावे आणि ३ सहस्र ९९९ वाडे आता पाण्यासाठी टँकरवर विसंबून आहेत. दुष्काळाच्या स्थितीमुळे टँकरने पाणीपुरवठा करणारी गावे आणि वाड्यांची संख्या वाढली असून, राज्यभरात सध्या २ सहस्र ९३ टँकरने पाणीपुरवठा चालू असल्याचे गंभीर वास्तव आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची वाढ २८ पटीने झाली आहे..
जलसंपदा विभागाने १२ एप्रिल या दिवशी घोषित केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अवघ्या ३४.१० टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२.०९ टक्के होता. छत्रपती संभाजीनगर येथील धरणांमध्ये केवळ १८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने परिस्थिती पुष्कळ कठीण झाली आहे. राज्यात २२ जिल्ह्यातील १ सहस्र ६६५ गावे आणि ३ सहस्र ९९९ वाड्या यांना यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्व प्रमुख धरणांमध्ये १२ एप्रिलपर्यंत ३४.१० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या
मराठवाडा विभागात १ सहस्र ६३, नाशिकमध्ये ४८१, पश्चिम महाराष्ट्रात ४२३, मुंबईत ८४, अमरावतीत ४० आणि नागपूर विभागात २ टँकरनी पाणीपुरवठा होत आहे. |