‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घरात पोचावा’, ही मनोकामना !
दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला लागल्यापासून माझ्यामध्ये होणारा पालट मला जाणवू लागला आहे. त्या जोडीला नामजपाची साथ असल्यामुळे मनात, तसेच अंगामध्ये जे दुर्गुण आहेत, ते संपू लागल्याची जाणीव मला सतत होऊ लागली आहे. मुख्य म्हणजे स्वतःची ओळख जी कुठेतरी लपलेली होती, ती माझी मलाच होत असल्याची जाणीव होऊ लागली आहे.
ज्या हिंदु धर्मामध्ये आपण सर्व जन्माला आलो, त्या धर्माची मला प्राथमिक ओळखसुद्धा नव्हती. आज या क्षणीसुद्धा जवळपास ८० टक्के हिंदूंची अशीच स्थिती आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन माझ्या हाती येते. त्याद्वारे धर्मशिक्षण मिळते. ‘येथूनच धर्मशिक्षणाचा हा ‘श्री गणेशा’ चालू झाला’, असे म्हणण्याचे कारण असे की, हे शिक्षण अर्धे वय उलटले, तरी ना शाळेत मिळाले, ना घरी मिळाले होते. बहुतांश हिंदूंची धर्मशिक्षणाच्या संदर्भात अशीच स्थिती आहे. त्यासाठी तरी हिंदूंनी ‘सनातन प्रभात’ वाचावे.
‘ज्या धर्मामध्ये आपण जन्मलो, त्या धर्माचेच आपल्याला शिक्षण नाही’, अशी स्थिती होण्यास आपली एवढ्या वर्षांची निधर्मी शासनव्यवस्था कारणीभूत आहे. घरातसुद्धा धर्माचे संस्कार मिळणे पूर्णतया बंद होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आपणच आपला धर्म आणि संस्कृती विसरून गेल्यास एक दिवस आपला उच्च विचारसरणीचा हिंदु धर्म जगातून पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. याला वेळीच आवर घालण्यासाठी ‘सनातन प्रभात’चा अंक प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये पोचावा’, अशी सर्व जण ईश्वराकडे मनोकामना व्यक्त करूया.
अन्य वर्तमानपत्रांची तुलना करता, ‘सनातन प्रभात’चे वेगळेपण आम्हाला ठळकपणे जाणवते. गल्लाभरू वर्तमानपत्रे जाहिरातीद्वारे पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जात आहेत. लाखो रुपयांच्या मिळकतीच्या अशा जाहिरातीपुढे बातम्या, वर्तमानपत्राद्वारे अपेक्षित सामाजिक उत्थान, लोकशिक्षण, असे विषय हल्ली दुय्यम ठरत आहेत. लोकशिक्षण, बातम्यांमध्ये सत्यनिष्ठा या आधारे समाज सदैव जागृत आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला असावा, हा उद्देश घेऊनच दैनिक ‘सनातन प्रभात’ नेहमी सकाळी माझ्या हातात येते. अशा ‘सनातन प्रभात’च्या हातातच आपला, देशाचा, जगाचा पर्यायाने अखिल मानवजातीचा भविष्यकाळ सुरक्षित आहे, ही शाश्वती वाटते.
– श्री. महेश पारकर, ज्येष्ठ कोकणी आणि मराठी साहित्यिक, शिरोडा, गोवा.