माझ्या जीवनात ‘सनातन प्रभात’ला पुष्कळ मोठे स्थान !
दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले, त्याला २५ वर्षे पूर्ण झाली. ही कारकीर्द मला अत्यंत तेजस्वी अशी वाटते. ‘सनातन प्रभात’ जे कार्य करत आहे, त्याचा २-३ दृष्टींनी मला उल्लेख करावासा वाटतो आणि प्रशंसा करावीशी वाटते.
एक म्हणजे सामान्य माणसाची आध्यात्मिक प्रगती ! या प्रगतीचा आलेख त्याला ‘सनातन प्रभात’मधून मिळत असतो. सामान्य माणसालाही वाटायला लागले आहे की, मी जर या साधनेच्या मार्गावर आलो, तर मी त्यात यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारचा एक आशावाद ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देशातील जनतेमधील राष्ट्रवाद अबाधित रहावा, अशा प्रकारचा ‘सनातन प्रभात’चा प्रयत्न गेली कित्येक वर्षे राहिलेला आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातही ‘सनातन प्रभात’मध्ये जे साहित्य छापून येते, त्याला मी पुष्कळ महत्त्व देतो. हिंदु समाजावर झालेले अन्याय, होणारे संभाव्य अन्याय, झालेले आघात आणि त्याच प्रकारे राष्ट्रीय जीवनावर (राष्ट्रावर) घडणारे अन्याय अन् आघात यांचे यथार्थ दर्शन लोकांसमोर मांडण्याचे काम ‘सनातन प्रभात’खेरीज अन्य कोणतेही वर्तमानपत्र करत नाही. सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ टाकण्यासाठी मी ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेल्या माहितीचा ९५ टक्के वापर करतो. माझ्या जीवनात ‘सनातन प्रभात’ला पुष्कळ मोठे स्थान आहे’, असे मी म्हणेन.
युवकांना ‘सनातन प्रभात’मधील लेखांच्या माध्यमातून माहिती मिळते. तरीदेखील आपल्या संतांच्या किंवा राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील काही घटना किंवा बोध देणार्या कथा प्रसिद्ध व्हाव्यात, त्याचप्रमाणे राष्ट्रीय जीवनावर आघात करणार्या घटना युवकांना चर्चेसाठी खुल्या कराव्यात आणि अशा प्रतिक्रिया ‘सनातन प्रभात’कडे येण्यासाठी खुले दालन ठेवावे, असे मला वाटते. ‘सनातन प्रभात’ला प्रतिक्रिया द्यायचा प्रारंभ युवकांनी केला पाहिजे, म्हणजे त्यांचा स्वतःचा सहभाग त्यामध्ये वाढेल. जोपर्यंत आपण नुसते वाचतो आणि आपण काही बोलत नाही, तोपर्यंत आपली मनःस्थिती सिद्ध होत नाही. आपण युवकांना काहीतरी करण्याच्या स्थितीत आणले पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया घेण्याचे सदर ‘सनातन प्रभात’मध्ये चालू केले, तर ते अधिक उपयुक्त होईल’, असे मला वाटते. मी आमच्या संस्था, कुटुंब आणि समाज यांच्या वतीने ‘सनातन प्रभात’चे अभिष्टचिंतन करतो आणि ‘अशाच प्रकारे निर्विघ्नपणे आणि अखंडपणे ‘सनातन प्रभात’चे कार्य अनेक वर्षे चालू राहो’, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो.
– प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा.