सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आरंभी जिज्ञासू आणि साधक यांच्यासाठी सत्संग अन् अभ्यासवर्ग घेत असत. समाजातील लोकांना याबद्दल माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या दैनिकांत ‘आजचे कार्यक्रम’, ‘थोडक्यात मुंबई’, ‘थोडक्यात महाराष्ट्र’ अशा सदरांमध्ये सत्संग आणि अभ्यासवर्ग यांची माहिती प्रकाशित होत असे; पण त्यासाठी मी विविध दैनिक कार्यालयांत जाऊन तिचा बराच पाठपुरावा करत होतो. तेव्हा अल्पशी माहिती प्रकाशित होत असे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला अभ्यासवर्ग आणि सत्संगात शिकवले होते,

  ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे ।
   शहाणे करून सोडावे सकळ जन ।।’

अर्थ : आपल्याला जे ठाऊक असते, ते हळूहळू इतरांना शिकवावे. अशा प्रकारे सर्वांना शिकवून शहाणे करावे.

पू.शिवाजी वटकर

त्यानुसार मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आणि त्यांनी शिकवलेल्या अभ्यासवर्गातील ‘अध्यात्म अन् साधना’ या विषयांवर लहान लेख लिहायचो आणि ते मुंबईतील दैनिकांच्या संपादकांकडे जाऊन प्रकाशित करण्याची विनंती करायचो. ते लेख प्रकाशित होणे अशक्य होते; कारण १९९० ते १९९५ मध्ये ‘अध्यात्म आणि साधना’ यांचे बहुतेक संपादकांना वावडे (ॲलर्जी) होते. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माझी अडचण सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही केलेले लिखाण छान आहे. दुसरी दैनिके हे छापत नसतील, तर आपणच आपले दैनिक काढू. मग तुम्ही पाहिजे तेवढे लिखाण करा.’’ एखादा मुलगा वडिलांना सांगतो की, ‘दुसर्‍या श्रीमंत मुलाकडे जशी चारचाकी गाडी आहे, तशा गाडीची मला आवश्यकता आहे.’ प्रत्यक्षात त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसते; पण त्यांच्यात सकारात्मकता अन् आत्मविश्वास असतो. त्या वेळी त्याचे वडील त्याला म्हणतील, ‘‘देवाच्या कृपेने तुला एक चारचाकी विकत घेण्यापेक्षा भविष्यात आपण गाडी (मोटार) बनवण्याचा कारखानाच काढू.’’ तेव्हा त्या मुलाला किती आनंद झाला असेल ? त्यापेक्षा अधिक आनंद मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘‘आपणच आपले दैनिक काढू’’, या आश्वासनात्मक वाक्याने झाला. ते साक्षात् भगवंताने दिलेले वचन होते. त्यांच्या या संकल्पानुसार आता ‘सनातन प्रभात’ची अनेक नियतकालिके अनेक भाषांमध्ये प्रकाशित होत आहेत.

‘सनातन प्रभात’ नियतकालिके प्रकाशित झाल्यापासून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. पुढील लिखाण मी अनुभवलेल्या प्रत्यक्ष घटना आणि प्रसंग यांवर आधारित आहे; परंतु विस्तार भयास्तव प्रसंगांचे वर्णन करू शकत नाही. ‘सध्या जगातील कुठल्याच दैनिकात पूर्णत्व आहे’, असे आपण सांगू शकत नाही; परंतु ‘पुढे दिलेल्या गुणवैशिष्ट्यांमुळे आणि ईश्वरी कृपेने ‘सनातन प्रभात’ नियतकालिके हळूहळू पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत’, असे मला वाटते.

आध्यात्मिक स्तरावरील कार्य

अ. आध्यात्मिक मार्गदर्शन करून संत बनवणार्‍या सनातनच्या शाळेला साहाय्य करणारे ‘सनातन प्रभात’ !

‘सनातन प्रभात’ साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी चैतन्यमय व्यासपीठ आहे. साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांतून साधना करण्यास प्रेरणा मिळते. संत आणि महर्षि यांनी साधनेसाठी दिलेल्या सूचना आणि सुवचने यांतून साधकांना योग्य अशी साधना करण्यास साहाय्य होते.

आ. सूक्ष्मातून कार्य करणारे ‘सनातन प्रभात’ ! अज्ञान आणि अनिष्ट शक्ती यांचे आवरण काढून ज्ञानशक्तीचा आनंद देणारे ‘सनातन प्रभात’ !

‘सनातन प्रभात’चे कार्य स्थूल, सूक्ष्म आणि चैतन्य यांच्या स्तरांवर चालते. व्यष्टी साधना आणि समष्टी कार्य यांमध्ये येणार्‍या अडचणींवरील आध्यात्मिक उपाय ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित केले जातात.

इ. कलियुगातील गीता असलेले ‘सनातन प्रभात’ !

‘श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवत्गीतेप्रमाणे ‘सनातन प्रभात’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता आहे’, असे मी ‘सनातन प्रभात’ प्रकाशित झालेल्या दिवसापासून अनुभवत आहे.

‘सनातन प्रभात’चे स्थूलातील कार्य

अ. वास्तव दर्शवून सत्यस्थितीला प्रकाशात आणणारे ‘सनातन प्रभात’!

आ. वृत्त आणि लिखाण यांतील भाव, विचार अन् दृष्टीकोन नेमकेपणाने व्यक्त होणारे ‘सनातन प्रभात’ !

इ. जगात घडलेल्या कुठल्याही प्रसंगात ‘कुठे चुकले ? त्याचा भविष्यात काय परिणाम होणार आणि त्यावर उपाययोजना काय असावी ?’ याचे शिक्षण देऊन कृतीशील विचार करण्यास प्रवृत्त करणारे ‘सनातन प्रभात’!

ई. वर्तमानात घडत असलेले प्रसंग किंवा कार्यक्रम यांना अनुसरून आणि जागृती करून ‘योग्य कृती काय करू शकतो ?’, हे सुचवणारे ‘सनातन प्रभात’ !

उ. करमणूक, खेळ यांपेक्षा ‘सध्याच्या कलियुगातील आपत्कालीन स्थितीत घडणार्‍या प्रसंगांत काय करू शकतो ?’ याविषयीचे वृत्त देणारे ‘सनातन प्रभात’ !

ऊ. केवळ बातमी छापणारे नाही, तर बातमी सिद्ध करणारे ‘सनातन प्रभात’ !

वर्ष २०२३ मध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून शासनाच्या निर्धारित बस भाड्यापेक्षा अनेक पटींनी बसभाडे आकारत. त्याच्या विरोधात वृत्त देऊन ‘सनातन प्रभात’ने जनजागृती केली होती. परिणामी शासनाच्या परिवहन विभागाने खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली होती.

ए. तत्त्वनिष्ठ ‘सनातन प्रभात’ !

कोणतेच दैनिक सर्व प्रकारच्या वाचकांच्या मनाचे समाधान करू शकत नाही. तत्त्वनिष्ठ राहून समाजाला काय आवडते, यापेक्षा सद्यःस्थितीत समाजाला नैतिक, सामाजिक, कौटुंबिक आणि धर्म अन् राष्ट्र यांच्या स्तरांवर काय आवश्यक आहे ? तेच ‘सनातन प्रभात’ देते.

ऐ.  साधक, संत, भक्त, धर्मादाय न्यास आणि मंदिरांचे विश्वस्त यांना आपलेसे करणारे ‘सनातन प्रभात’ !

‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये

अ. नित्य नूतन ‘सनातन प्रभात’ !

आ. वाचक आणि साधक यांच्या मनीचे हितगुज साधणारे गुरुरूपी ‘सनातन प्रभात’ !

इ. तळमळीने, सातत्याने आणि चिकाटीने जनप्रबोधन करणारे ‘सनातन प्रभात’ !

ई. सुटी किंवा सवलत न घेता जनप्रबोधनाचे अविरत कार्य करणारे ‘सनातन प्रभात’ !

(नारद मुनींसारखे कार्य करणारे वार्ताहर आणि संपादक)

उ. पैसा, प्रसिद्धी किंवा केवळ ‘वाचक संग्रह’ यांपासून दूर रहाणारे ‘सनातन प्रभात’ !

ऊ. धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांसाठी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव ‘सनातन प्रभात’ !

माझ्या साधनेच्या आणि जीवनाच्या प्रवासात मला ‘सनातन प्रभात’ दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत आहे. त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि ‘सनातन प्रभात’ संबंधी सेवा करणार्‍या सर्व साधकांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.२.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.