मी दैनिक ‘सनातन प्रभात’ : श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या लेखणीची चैतन्यमय धार असणारा एक अविरत कार्यरत धर्मयोद्धा !
अध्यात्माच्या मार्गावरून चालणार्यांसाठी दैनिक हे गुरुदेवांचा संदेशवाहक !
‘नमस्कार, मी सनातन प्रभात…!’
‘मी माझ्या कार्याला २५ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यपूर्तीसाठी घडणार्या त्रिभुवनातील असंख्य स्थूल आणि सूक्ष्म घटनांचे मला साक्षीदार होता आले. हे सर्व विष्णुस्वरूप गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने शक्य झाले. मला गुरुसेवेची ही संधी देणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या आणि मला कार्यरत ठेवणार्या साधकांच्या प्रति कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. या पंचवीस वर्षांच्या जडण-घडणीत अनुभवलेले दिवस या मनोगतातून गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.
असंख्य अडथळे पार करून कार्यरत रहाणे !
प्रथमच माझ्या माध्यमातून ‘अध्यात्म’ हा विषय समाजमनावर बिंबवण्याचे कार्य होत होते. ‘एक प्रकारे समाज आध्यात्मिकदृष्ट्या साक्षर होत आहे’, हे निधर्मी आणि सनातनद्वेष्टे यांना सहन झाले नाही. त्यानंतर ‘सनातन प्रभात’च्या द्वेष्ट्यांनी असंख्य ठिकाणी माझी होळी केली. माझ्यातील प्रत्येक लिखाणाचा विरोधाभास निर्माण करणारा अर्थ काढून माझ्यावर गुन्हे नोंद करून माझा सांभाळ करणार्यांवर शाब्दिक शिंतोडे उडवण्यात आले. तेवढेच नव्हे, तर माझ्यावर कायमस्वरूपी बंदी घातली जावी, यासाठी असंख्य धर्मद्रोही पक्ष आणि संघटना कार्यरत झाल्या. माझे कार्य बंद पाडण्यासाठी संपादकांना अटक करून पोलीस कोठडीतही ठेवण्यात आले. या काळात मला सांभाळणारे गुरुदेव आणि साधक यांना पुष्कळ यातनांना सामोरे जावे लागले. एवढा विरोध होऊनही कधीही गुरुदेवांनी मला बाजूला ठेवले किंवा बंद केले, असा एकही दिवस झाला नाही. उलट जेवढा विरोध होत होता, तेवढी माझी झळाळी वाढतच होती. त्यामुळे अध्यात्माच्या मार्गावरून चालणार्यांसाठी मी एक संदेशवाहक दूत झालो होतो.
गुरुदेवांचा संदेशवाहक झाल्याने ‘सनातन प्रभात’ला आध्यात्मिक आणि सामाजिक प्रतिष्ठा अल्प कालावधीत प्राप्त होणेसमाजमनाला अध्यात्माचे बाळकडू पाजणारे, हिंदूंच्या समस्या परखडपणे मांडणारे, हिंदूंच्या देवतांचा आदर करणारे, हिंदूंना आपलेसे वाटणारे असे एकही वर्तमानपत्र अस्तित्वात नसतांना माझी निर्मिती गुरुदेवांनी केली. माझ्या माध्यमातून गुरुदेवांनी समाजात पुष्कळ चैतन्य कार्यरत केले. त्यामुळे प्रतिदिन अध्यात्मविषयक ज्ञानामृत पिणारा समाज मला ‘गुरुदेवांचा संदेशवाहक’ असेच संबोधत असे. जणू द्वापरयुगात श्रीकृष्णाने सांगितलेली गीताच माझ्यातील आध्यात्मिक उद्बोधक लिखाणातून समाजास आचरणात आणण्यास मिळत होती. त्यामुळे मी ४ पानी लहान असलो, तरी मला लौकीकदृष्ट्या आध्यात्मिक आणि सामाजिक प्रतिष्ठा अल्प कालावधीत प्राप्त झाली. |
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प आणि साधकांचे परिश्रम यांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची निर्मिती होणे
‘गुरुकृपायोगा’चे जसे श्रीविष्णूच्या नाभीतून अवतरण झाले, त्याचप्रमाणे माझी निर्मिती श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांनी २५ वर्षांपूर्वी ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’चे ध्येय ठेवून केली. प्रारंभी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्यात आले. त्यानंतर माझी, म्हणजेच दैनिक ‘सनातन प्रभात’ची निर्मिती करण्यात आली. माझे स्वरूपच छोटे आणि तेही ४ पानी होते. प्रारंभी ‘४ पानी दैनिक ‘सनातन प्रभात’ नावाचे इवलसे रोपटे असलेले माझे स्वरूप कसे संभाळायचे ? त्यातून समाजमन कसे घडवायचे ?’, असे प्रश्न असतांना केवळ गुरुदेवांच्या संकल्पामुळे मी कार्यरत झालो. सहस्रो साधक मला कार्यप्रवण करण्यासाठी विविध सेवांच्या माध्यमातून कार्यरत झाले. बातम्या तयार करणार्या वार्ताहरांपासून प्रारंभ केला, तर शुद्धलेखन तपासणारे संकलक, रचनाकार, छपाई, वितरण, विज्ञापने गोळा करणार्यांसह असंख्य सेवांसाठी सर्व साधक अविरत कार्यरत झाले होते. या सर्वांच्या परिश्रमातून आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संकल्पनेतून माझी निर्मिती झाली.
२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समाजमन घडवण्यासह साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी वैविध्यपूर्ण लिखाण प्रसिद्ध करणे
माझ्या माध्यमातून गुरुदेवांनी समाजमनाला आकार देण्यासमवेतच साधकांच्या साधनेलाही आकार देण्याचे कार्य चालू केले. माझ्या माध्यमातून एकीकडे समाजमन घडवण्यासाठी सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन अन् साधनेला पोषक असे ज्ञान दिले जात होते. सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या परखडपणे मांडल्या जात होत्या. एक प्रकारे या सर्वांतून अध्यात्मापासून दूर गेलेल्या समाजाला साधनेचे बाळकडू पाजले जात होते आणि समाज कृतीप्रवण होण्यास प्रारंभ झाला. दुसरीकडे मला सांभाळणार्या साधकांची जलद आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी त्यांची जडण-घडण चालू झाली. त्याचे एकच उदाहरण पहायचे, तर साधकांना चुका सांगून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून त्या समाजासमोर प्रतिदिन प्रांजळपणे मांडल्या जात होत्या. साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी विविध स्वरूपांतील लिखाण प्रसिद्ध करण्यासह अनेक गोष्टींतून साधकांच्या मनाला आकार देण्याचे काम गुरुदेवांनी चालू केले.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्रतिदिन चालवणे, हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीचे असतांनाही गुरुदेवांनी ते अविरत कार्यरत ठेवणे
एकीकडे मी प्रसार आणि प्रचार या दृष्टीने दिवसेंदिवस मोठा होत होतो. माझ्या म्हणजेच ‘सनातन प्रभात’च्या ४ आवृत्त्या चालू झाल्या. त्याचबरोबर मराठी आणि कन्नड भाषेतील साप्ताहिकही चालू होते. हिंदी, इंग्रजी आणि गुजराती ही पाक्षिकेही चालू झाली. माझे छोटेसे हे रूप एका वृक्षात रूपांतरित करण्याचे काम या समूहाच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी केले. मला सांभाळणे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या खडतर असतांना ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’चा हेतू डोळ्यांसमोर ठेवून केलेली माझी निर्मिती आणि त्यापुढील माझी वाटचाल अविरत चालूच होती. पुढे मला ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’चे ध्येय दिले गेले आणि आता मी ‘धर्मजागृती आणि हिंदूसंघटन’ यांसाठी कार्यरत झालो आहे.
४. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या माध्यमातून गुरुदेवांनी चैतन्य घरोघरी पोचवणे
अध्यात्माचे बाळकडू जसे समाजमनाला पाजले जात होते, तसेच माझ्या माध्यमातून गुरुदेवांचे चैतन्य घरोघरी पोचू लागले. अनेकांना तशा अनुभूतीही आल्या. सच्चिदानंद गुरुदेवांनी माझी ख्याती आता चैतन्यस्वरूप ‘सनातन प्रभात’अशी केली.
५. शेकडो चळवळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून राबवून खर्या अर्थाने समाजाला कृतीप्रवण करणे
समाजात चालत आलेल्या आध्यात्मिकदृष्ट्या हानी पोचवणार्या असंख्य रूढी, घटना आणि कृती यांना माझ्या माध्यमातून विरोध करून सामाजिक चळवळी उभारण्यात आल्या. शेकडो चळवळी माझ्या माध्यमातून राबवण्यात आल्या. त्यातून खर्या अर्थाने समाज कृतीप्रवण होऊ लागला. गुरुदेवांनी माझ्या माध्यमातून समाजाला योग्य-अयोग्य ज्ञान देण्याचे कार्य करून समाजातील सात्त्विकता वाढवण्याचे कार्य केले. या कार्यासाठी माझी निवड केली, हे माझे कित्येक जन्मांचे भाग्यच म्हणावे लागेल.
६. ‘सनातन प्रभात’रूपी धर्मयोद्धा कार्यरत रहाणे आवश्यक !
आज या छोट्या रोपट्याचे रूपांतर गुरुदेवांनी वृक्षात केले आहे. ४ पानी असलेला मी आज प्रतिदिन ८ पानी, तर कधीकधी २० पानांपर्यंत माझी मजल गेली आहे. भलेही मी समाजात अन्य दैनिकांप्रमाणे वितरणाच्या दृष्टीने मोठा नसेन; पण ‘माझी निर्मिती ज्या उद्देशाने झाली, त्या उद्देशाने हे कार्य अविरत चालू आहे’, यातच मी आनंदी आहे. मी नुसता समाजमनाला घडवत नाही, तर कृतीशील आणि सत्त्वप्रधान समाज निर्माण करण्याचे कार्य माझ्या माध्यमातून गुरुदेव करत आहेत. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव असंख्य ग्रंथांतील आध्यात्मिक ज्ञानाने पुढील शेकडो वर्षे समाज घडवण्याचे कार्य करत आहेत, तसेच माझ्या माध्यमातूनही ते प्रतिदिन समाज घडवून समाजाला कृतीशील करत आहेत’, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी गुरुदेवांचा एक धर्मयोद्धा आहे. जो अविरत कार्यरत आहे आणि पुढेही हिंदु राष्ट्राची रचना पूर्ण होईपर्यंत, तसेच गुरुदेवांना अपेक्षित असेल, तोपर्यंत असाच कार्यरत रहणार आहे. ‘माझ्या माध्यमातून कार्यरत झालेली ज्योत गुरुदेवांनी सदैव तेवत ठेवून मला या धर्मसंस्थापनेच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी द्यावी’, हीच माझी गुरुदेवांच्या कोमल चरणी प्रार्थना !’
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
– दैनिक ‘सनातन प्रभात’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |