CPI(M) MANIFESTO : माकपच्या घोषणापत्रात भारताने अण्वस्त्रे नष्ट करून देशाला शक्तीहीन करण्याचे घातक आश्‍वासन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माकपवर टीका !

बाडमेर (राजस्थान) – देशातील अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या घोषणापत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचार सभेत टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे २ (पाक आणि चीन) शेजारी अण्वस्त्रांनी सज्ज असतांना, विरोधकांना भारत शक्तीहीन बनवायचा आहे. विशेषतः माकपला. या पक्षाने त्याच्या घोषणापत्रात ‘रासायनिक आणि जैविक शस्त्रांसह अण्वस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात विनाश करणारी इतर शस्त्रे पूर्णपणे नष्ट करणार’, असे वचन दिले आहे. मला काँग्रेसला विचारायचे आहे की, तिचे मित्रपक्ष कुणाच्या आदेशानुसार काम करत आहेत ? ही कोणत्या प्रकारची युती आहे ? भारत शक्तीहीन आहे का ? एकीकडे आमचे सरकार भारताला एक सशक्त राष्ट्र बनवण्याचे काम करत आहे, तर दुसरीकडे ‘इंडी’ आघाडीने भारताला कमकुवत देश बनवण्याच्या योजना घोषित केल्या आहेत.

माकपच्या घोषणापत्रातील भारतविरोधी आश्‍वासने !

१. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘क्वाड’ गटातून भारताला बाहेर काढणार.

२. भारतीय उपखंडातील सर्व सैनिकी केंद्रे बंद करणार. विशेषत: हिंद महासागरातील दिएगो कराकस येथील अमेरिकी सैन्य तळ.

३. भारतातील सर्व प्रकारची अण्वस्त्रे पूर्णपणे नष्ट केली जातील. तसेच भारतातून सर्व प्रकारची सामूहिक संहारक शस्त्रे, रासायनिक शस्त्रे आणि जैविक शस्त्रे पूर्णपणे नष्ट केली  जातील.

४. अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) आणि ध्रुवीय भागात सैनिकीकरणाला विरोध करणार.

५. देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारे आणि हितसंबंधांवर परिणाम करणारे अमेरिकेसमवेतचे सर्व प्रकारचे धोरणात्मक संबंध संपुष्टात आणले जातील.

६. इस्रायलसमवेतचे सर्व प्रकारचे सामरिक, सुरक्षा आणि सैनिकी संबंध संपुष्टात आणले जातील.

७. संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलवर निर्बंध घालण्याची मागणी करणार.

८. सीमा विवादावर तोडगा काढण्यासाठी चीनशी वाटाघाटी करणार आणि सर्व प्रकारच्या संबंधांना चालना देणार.

९. पाकिस्तानसमवेत वादात असलेले सर्व सूत्रे सोडवण्यासाठी चर्चा करणार.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारचे राष्ट्राघातकी आश्‍वासन देऊन जनतेकडून मते मागणार्‍या पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना कारागृहात डांबण्याची मागणी जनतेने आतापर्यंत करणे आवश्यक होते. अशी मागणी न होणे हे भारतियांना लज्जास्पदच म्हणावे लागेल !