‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !
दैनिक ‘सनातन प्रभात’ २५ व्या वर्धापनदिनानिमित्त संदेश
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समाजामध्ये क्षात्रतेजाचे जागरण करणे, हे काळानुसार एक आवश्यक कार्य आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ गेली २५ वर्षे हे वैचारिक कार्य वर्षातील ३६५ दिवस, म्हणजे सुट्टी न घेता अखंडपणे करत आहे. वर्ष १९९९ मध्ये पत्रकारितेचे कुठलेही शिक्षण नसलेल्या सनातनच्या साधकांच्या साहाय्याने चालू केलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’ने आज २५ वर्षे पूर्ण करणे, ही एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आहे. ‘ईश्वराचे कार्य ईश्वरच करवून घेत असतो’, या उक्तीप्रमाणे ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ईश्वरच कार्य करत आहे. पुरेशा प्रमाणात न मिळणारी विज्ञापने, पत्रकारितेतील व्यावसायिकतेचा अभाव, अप्रशिक्षित मनुष्यबळ इत्यादी अनेक अडचणी असूनही ईश्वरी कृपेने ‘सनातन प्रभात’ चालू आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची गेल्या २५ वर्षांतील वाटचाल तर व्यावसायिक वृत्तपत्रांनाही लाजवणारी आहे.
समाजात अधिकाधिक धर्मजागृती व्हावी, यासाठी आरंभी ४ पानी असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’ ऑक्टोबर २०१३ मध्ये ६ पानी आणि रविवारी ८ पानी झाले, तर जानेवारी २०१५ पासून ते ८ पानी अन् रविवारी १० पानी झाले आहे. पृष्ठसंख्या वाढल्याने राष्ट्र अन् धर्म हिताच्या, तसेच राष्ट्र अन् धर्म हानीच्या अधिकाधिक घटना वाचकांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे. विज्ञापनांची संख्या न वाढताही केवळ हिंदूंमध्ये धर्मजागृती करण्याच्या हेतूने वाढवलेली पृष्ठसंख्या हे ‘सनातन प्रभात’च्या निःस्वार्थी कार्याचे प्रतीक आहे.
या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले.
आज ‘सनातन प्रभात’चा ब्राह्म-क्षात्रतेजाचा दृष्टीकोन विकसित झालेला वाचकवर्गच सनातन धर्माची शक्ती बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली ही धर्मशक्ती धर्मसंस्थापनेच्या कार्याला बळ देईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन करील !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक-संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह (१.४.२०२४)