पुणे येथे ३० वर्षांपूर्वी दुरुस्ती अर्ज देऊनही ८५ वर्षीय वॉल्टर सलढाणा यांना मतदान ओळखपत्र मिळाले नाही !
अनेक वेळा पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर नाही !
पुणे – लष्कर परिसरातील सेंट व्हिन्सेट मार्गावरील ८५ वर्षीय वॉल्टर सलढाणा यांच्या मतदार ओळखपत्रामध्ये अनेक चुका होत्या. त्यांनी ते दुरुस्तीसाठी दिले; परंतु गेली ३० वर्षे झाली, अनेक वेळा पाठपुरावा केला, तरीही सलढाणा यांना दुरुस्त केलेले ओळखपत्र मिळाले नाही. ‘आता मतदान करता येईल का ?’ असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला; परंतु त्यांना समाधानकारक उत्तर किंवा दुरुस्त केलेले ओळखपत्र मिळाले नाही. (यासाठी उत्तरदायी कोण आहेत ? हे निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे. – संपादक)
सलढाणा यांना वर्ष १९९४ मध्ये मतदान ओळखपत्र मिळाले. त्यात देवनागरी आणि इंग्रजी भाषेत अनेक चुका आढळून आल्या. मराठी भाषेत ‘वॉल्टर’ ऐवजी ‘वॉलटेर’, तर ‘सलढाणा’ ऐवजी ‘सलदाना’ असा उल्लेख होता. त्यांनी ते ओळखपत्र स्वीकारले नाही. त्यांनी ते १७ नोव्हेंबर १९९४ या दिवशी पोचपावतीसह परत केले. त्यांना आधारकार्डही अद्याप मिळालेले नाही. अनेक ठिकाणी आधारकार्ड नसल्याने त्यांची असुविधा होते. भारतीय नागरिक असूनही त्यांना सरकारी योजनांचा कोणताही लाभ घेता येत नाही. लोकशाहीतील मतदान करण्याचा हक्क बजावता येत नाही, अशी खंत त्यांना वाटते. (ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका नव्हे का ? – संपादक)