जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणारे उधमसिंग !
आज ‘जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिन’ आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
वर्ष १९४०. दिवस १३ मार्च. लंडनमधील कॅक्स्टन हॉलमध्ये (सभागृहामध्ये) ब्रिगेडियर जनरल सर पर्सी साईक्स यांचे अफगाणिस्तानविषयीचे भाषण चालले होते. भाषण संपल्यावर भारतमंत्री लॉर्ड झेटलंडने कार्यक्रम संपल्याचे घोषित केले. या कार्यक्रमाला मुंबईचा पूर्वीचा गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन आणि पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर सर लुईस डेन हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाला अजून २ लोक उपस्थित होते ते, म्हणजे पंजाबचा पूर्वीचा अजून एक गव्हर्नर सर मायकेल ओड्वायर आणि ‘महंमद सिंग आझाद’ हे नाव (नाव नीट वाचा म्हणजे कळेल !) घेऊन तिथे आलेला भारतीय क्रांतीकारी उधमसिंग !
१. उधमसिंग यांनी लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी केलेली कामे
कसेबसे पैसे जमा करून फक्त जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी आलेल्या उधमसिंग यांनी लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी गाड्या दुरुस्त करणे, रंगारीकाम, सुतारकाम वगैर अशी अनेक फुटकळ कामे केली. एक सहसा ठाऊक नसलेले सूत्र, म्हणजे उधमसिंग यांना अभिनयाचेही अंग होते. त्यांनी लंडनमध्ये असतांना ‘द फोर फेदर्स’ आणि ‘एलिफंट बॉय’ या २ इंग्रजी चित्रपटांत कामही केले होते; पण हे सगळे वरवरचे होते. त्यांचा लंडनला यायचा मूळ हेतू जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेणे, हाच होता आणि ते संधीची वाटच पहात होते.
२. उधमसिंग यांनी केलेली पूर्वसिद्धता
कॅक्स्टन हॉलच्या सभेचे आमंत्रण त्यांना मिळाले. मग त्यांनी पूर्वसिद्धता चालू केली. बोर्नमाऊथला जाऊन एका इंग्रज शिपायाकडून जाऊन एक जुने पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या. एका पुस्तकात त्या पिस्तुलाच्या आकाराची पोकळी बनवून त्यात ते लपवले. स्वतःसमवेत एक चाकूही खिशात घेतला.
|
३. ओड्वायरवर गोळ्या झाडल्या आणि उधमसिंग यांना अटक अन् फाशी !
१३ मार्च या दिवशीच्या सभेला उधमसिंग यांनी महंमद सिंग आझाद या नावाने मस्त सूट, टाय आणि ट्रिल्बी हॅट वगैरे त्या वेळचा ठराविक इंग्रजी पोषाख घालून हॉलमध्ये ऐटीत प्रवेश केला. वर सांगितलेले साईक्स यांचे भाषण संपताच त्यांनी पुस्तकातून पिस्तुल काढून ६ गोळ्या झाडल्या. ओड्वायरला २ गोळ्या लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला. २ गोळ्या लॉर्ड झेटलंडला चाटून गेल्या. सर लुईस डेन यांच्या मनगटावर १ आणि १ गोळी लॉर्ड लॅमिंग्टनच्या हाताला लागली. या वेळी २ लोकांनी लगेच झडप मारून उधमसिंग यांना पकडले.
पुढे लंडनमधील न्यायालयात खटला चालला. उधमसिंग यांना ३१ जुलै १९४० या दिवशी लंडनमधील पेंटॉनव्हिले कारागृहातच फाशी दिली आणि त्यांचे प्रेतही कारागृहाच्या आवारातच पुरले गेले.
जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणार्या उधमसिंग यांची आठवण आज फक्त २० सेकंद ! इतके कशाला फक्त २ सेकंद आली तरी पुरे. नाही का ?
– श्री. संकेत कुलकर्णी, लंडन.
(श्री. संकेत कुलकर्णी यांच्या फेसबुकवरून साभार)