मोशी (पिंपरी) येथील जलवाहिनीला गळती; सहस्रो लिटर पाणी वाया !
पिंपरी (पुणे) – उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३५ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नागरिकांना महापालिकेकडून करण्यात येत आहे. असे असतांना महापालिकेच्या विभाग ११ आणि १३ स्पाईन रस्त्यावरील जलवाहिनीला गळती लागली. हे निदर्शनास येताच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कार्य त्वरित चालू करण्यात आले आहे. या जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तोपर्यंत सहस्रो लिटर पाणी वाहून जाऊन पाण्याची नासाडी झाल्याचे दिसून येते. (या घटनेतून पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते ! – संपादक)
या जलवाहिनीतून चर्होली, मोशी, डुडूळगाव, बोर्हाडेवाडी, चोवीसवाडी, वडमुखवाडी, देहू रस्ता, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणीनगर, सर्व प्राधिकरण विभाग क्र. ४, ६, ९, ११, १३, तसेच सद्गुरुनगर या सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ‘काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल’, असे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, यांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिका :जलवाहिनीला गळती कशी लागते ? महापालिका प्रशासन वेळोवेळी तिची पडताळणी करत नाही का ? |