स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून देऊन आयुष्य वेचले ! – योगेश सोमण, अभिनेते
हिंदु व्यासपिठाच्या वतीने आयोजित कोल्हापूर येथील ‘डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाला !’
कोल्हापूर – ‘स्वातंत्र्य लक्ष्मी’ ही पहिली उद्घोषणा करून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून दिले. त्यात त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले, असे प्रतिपादन अभिनेते योगेश सोमण यांनी केले. येथील हिंदु व्यासपिठाच्या वतीने आयोजित ‘डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाले’त ते बोलत होते. ‘क्रांतीकारक सावरकर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. शाहू स्मारक भवनमध्ये ही व्याख्यानमाला चालू आहे.
सोमण पुढे म्हणाले की, देश पारतंत्र्यात असतांना देशातील नागरिकांची होणारी कोंडी सोडवण्यासाठी जे क्रांतीकारक पुढे आले, त्यामध्ये सावरकर होते. सावरकरांनी देशाला संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ध्यास घेतला आणि ते लढ्यात उतरले. राष्ट्रभक्त संघटना स्थापन करून त्यांनी कार्य चालू केले. संघटनेत जे येतील, त्यांना घेऊन गुप्त पद्धतीने इंग्रज सरकारच्या विरोधात कारवाया केल्या. हे काम करत असतांना त्यांना अनेक वेळा इंग्रजांनी पकडले, अटकही झाली; पण त्यातून सुटून आल्यानंतर त्यांनी सरकारच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या. सावरकर हे कधीही ध्येयापासून बाजूला झाले नाहीत.