श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन चैतन्य दिल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !
१. आध्यात्मिक त्रासामुळे श्वास घेता येत नसल्याने पुष्कळ अस्वस्थ वाटणे आणि ‘आता आपण जगणार नाही’, असा विचार मनात येणे
‘एकदा रात्री १.३० ते ३.३० या कालावधीत मला अकस्मात् माझ्या छातीपासून गळ्यापर्यंत दाब जाणवत होता. मला कुणीतरी सूक्ष्मातून दाबत असल्यासारखे वाटत होते. त्या वेळी माझ्या त्रासाची तीव्रता अल्प होती.
२ दिवसांनी रात्री १० वाजता मला असाच त्रास झाला. त्या वेळी श्वास घेता येत नसल्याने मला पुष्कळ अस्वस्थता जाणवत होती. ‘आता मी जगणार नाही’, असा विचार माझ्या मनात येऊ लागला आणि मला काही सुचतही नव्हते. त्यामुळे मला नामजपादी उपाय विचारायचेही लक्षात आले नाही. मला त्रास होत असतांना माझे यजमान झोपण्याच्या सिद्धतेत होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही झोपेतून मध्येच उठलात, तर ‘मी जिवंत आहे ना ?’, हे बघा.’’ यजमानांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते झोपले; परंतु मला त्रास होत असल्याने मी झोपू शकले नाही. माझी तडफड चालू होती.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन साधिकेला स्पर्श करणे आणि त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर साधिकेचा त्रास उणावणे
साधारण पहाटे ३ वाजता मला स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आमच्या खोलीत आलेल्या दिसल्या. त्या माझ्या डोक्यापासून पाठीपर्यंत हात फिरवत माझ्याशी बोलत होत्या. ‘त्या काय बोलत आहेत ?’, हे मला कळत नव्हते. त्यांचे बोलणे झाले आणि त्या खोलीतून बाहेर पडून मार्गिकेतून जाऊ लागल्या. मी त्यांच्या पाठोपाठ खोलीच्या बाहेर आले; परंतु त्या थोड्या पुढे जाताच दिसेनाशा झाल्या. त्यानंतर मी खोलीत आले आणि झोपले. त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून येऊन मला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शामुळे मला चैतन्य मिळाले आणि मी जिवंत राहिले’, असे मला जाणवले. त्यानंतर मला परत तसा त्रास झाला नाही. ही केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचीच कृपा आहे.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामुळे त्रास न्यून होऊन जिवंत असल्याची साधिकेला जाणीव होणे आणि त्यानंतर दिवसभर कृतज्ञताभावात रहाणे
दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रात्री मला होणारा त्रास न्यून झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी पूर्ण बरी झाले होते. त्यानंतर मला वरील प्रसंग आठवला आणि ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामुळे माझा त्रास न्यून होऊन मी जिवंत आहे’, याची मला जाणीव झाली. सकाळी यजमान उठल्यानंतर मी त्यांना वरील अनुभूती सांगितली. तेव्हा त्यांचाही भाव जागृत झाला. त्यानंतर दिवसभर माझा कृतज्ञताभाव जागृत होता आणि ‘मला पुनर्जन्म मिळाला असून तो केवळ साधनेसाठीच आहे’, याची मला जाणीव झाली.
‘हे करुणाकरा, ‘तू दिलेल्या या जन्माचे सार्थक होण्यासाठी मला साधना करण्याचे बळ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सारिका कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |