सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अमूल्य मार्गदर्शन !
‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘देव आणि आपण’ हे एकच नाते खरे असते !
एका साधिकेने सांगितले, ‘‘मला काही जण सांगतात, ‘‘तुम्हाला नात (मुलाला मुलगी) झाली, तर घरी जाऊन या.’’ त्यावर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) म्हणाले, ‘‘हे व्यावहारिकदृष्ट्या ठीक आहे; मात्र देव आणि आपण’, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक’, असे असते.’’ गुरुदेवांचे बोलणे माझ्या अंतर्मनापर्यंत पोचले. तेव्हा मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
२. तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही नामजपादी उपाय करण्याचा आळस करणार्या एका साधिकेला गुरुदेव म्हणाले, ‘‘प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, म्हणजे मन ऐकायला लागते.’’ तेव्हा ‘स्वभावदोष निर्मूलनासाठी स्वयंसूचना सत्रे करण्यासह कठोर प्रायश्चित्त घेणे’, हा अध्यात्मातील प्रगतीचा विहंगम मार्ग आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.
३. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक नामजपादी उपाय करत नसल्यास त्याच्या कुटुंबियांनी त्याला कठोर शब्दांत सांगितल्यास त्याच्या अंतर्मनाला जाणीव होते !
एका साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही तो नामजपादी उपाय करत नाही. गुरुदेवांनी त्या साधकाच्या आईला विचारले, ‘‘तुम्ही त्याला नामजपादी उपाय करायला सांगता का ?’’ तेव्हा साधकाच्या आईने सांगितले, ‘‘मी सांगते; पण तो ऐकत नाही.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘तो ऐकत नाही, तर तुम्ही त्याला कठोर शब्दांत सांगता का ? असे सांगितल्यामुळे बाह्यमनाला त्याची जाणीव झाली नाही, तरी अंतर्मनाला जाणीव होते.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि पुष्कळ आनंद झाला. ‘आपले कुटुंबीय आणि सहसाधक यांना साधनेत साहाय्य होण्यासाठी काही वेळा कठोर शब्दांत सांगणे’, हीसुद्धा साधना आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.
४. ‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी आहे’, हे लक्षात ठेवून जिज्ञासूंनाच साधनेविषयी सांगावे !
एका साधकाने सांगितले, ‘‘माझी आई सांगते, ‘‘नातेवाईक ऐकत नाहीत, साधना करत नाहीत. ते तुझे ऐकतील. तूच त्यांना भ्रमणभाष करून सांग.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी आहे. कुणी स्वतःहून विचारल्याविना सांगायला नको.’’
५. एका साधिकेने सांगितले, ‘‘कुणी काही दिले, तर मनात देवाण-घेवाण हिशोब रहातो.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘मागितले, तर देवाण-घेवाण हिशोब रहातो. कुणी स्वतःहून दिले, तर देवाण-घेवाण हिशोब रहात नाही.’’
६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ साधकांना नामजपादी उपाय सांगतात,त्यासाठी साधकांनी कृतज्ञताभावात रहायला हवे !
एका साधकाने सांगितले, ‘‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारल्यावर त्रास लगेच न्यून होतो.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘सद्गुरु गाडगीळकाका नामजपादी उपाय सांगतात आणि स्वतः करतातही. असे संत देवाने आपल्याला दिले आहेत.’’ तेव्हा माझ्या मनात कृतज्ञताभाव दाटून आला. मला वाटले, ‘देवाने आपल्यासाठी आणखी काय करायचे ठेवले आहे !’ साधकांमध्ये ‘आम्ही सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय करतो’, हा अहंभाव रहायला नको’, यासाठी गुरुदेव साधकांना कृतज्ञताभावात रहायला शिकवतात अन् गुरुदेव साधकांचे अहंनिर्मूलन करतात’, हे मला शिकायला मिळाले. ‘देवच सर्व काही करतो’, या भावात अखंड रहाता येणे’, हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच शक्य आहे.
गुरुदेव, आपण सर्वज्ञ आहात. ‘आम्हा साधकांना अखंड कृतज्ञताभावात रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |