सातारा येथून महाविकास आघाडीच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर !

सातारा, १२ एप्रिल (वार्ता.) – सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाकडून माजी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघात बैठकांचा धडाका चालू केला आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या जागेवरून उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. ही जागा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याविषयीही चर्चा झाली होती; मात्र सातारा हा शरदचंद्र पवार गटाचा पारंपरिक मतदारसंघ राहिल्यामुळे ही जागा आपणच लढण्याविषयी या गटाचा निर्णय झाला. तसेच अनेक नेत्यांनीही याविषयी सकारात्मता दर्शवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली. ढोल, ताशे, तुतारी यांच्या निनादात शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.