सर्वसामान्यपणे सूर्याचा जप करायचा झाल्यास ‘श्री सूर्याय नमः ।’ हा प्रचलित नामजप करावा !
प्रश्न : ‘श्री सूर्याय नमः ।’ या ऐवजी ‘ॐ आदित्याय नमः ।’ हा नामजप करावा का ?
उत्तर : ‘सूर्याचे सर्वांना प्रचलित असे नाव म्हणजे ‘सूर्यनारायण’. ‘उदयापासून ते अस्तापर्यंत आकाशात भ्रमण करणार्या सूर्याला ऋग्वेदात ‘सूर्य’ म्हटले आहे.’ (संदर्भ : गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००९)) सूर्याची १२ नावे प्रसिद्ध आहेत आणि ती १२ नावे त्याच्या वेगवेगळ्या गुणांनुरूप किंवा कार्यांनुरूप दिली गेली आहेत. त्या १२ नावांमध्ये ‘आदित्य’ हे एक नाव आहे आणि त्याचा अर्थ ‘पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जा आणि घडामोडी यांचे मूळ सूर्य आहे. ते मूळ, तो आदित्य’, असा आहे. तशी सूर्याची आणखीही नावे आहेत आणि ती ‘श्री सूर्यसहस्र नाम’मध्ये दिली आहेत.
सूर्याच्या कोणत्याही नामाचा जप केल्यास तो सूर्यनारायणापर्यंत पोचतो. असे असले, तरीही एखाद्या विशिष्ट कार्याच्या उद्देशाने सूर्याच्या एखाद्या विशिष्ट नामाचा जप करू शकतो, उदा. पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा आणि कार्याचा मूळ स्रोत हा ‘आदित्य’ (सूर्याच्या १२ नावांपैकी एक नाव) असल्याने एखाद्या सत्कार्यासाठी ऊर्जा (बळ) हवी असल्यास ‘ॐ आदित्याय नमः ।’ हा जप करू शकतो. प्रभु श्रीरामानेही रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी ब्रह्मर्षि अगस्ती यांच्या सांगण्यावरून ‘आदित्य हृदय’ या स्तोत्राने सूर्यनारायणाची प्रार्थना केली. श्रीरामप्रभु सूर्यनारायणाच्या कृपाप्रसादाने रावणवध करू शकला. अशा प्रकारे सूर्याच्या १२ नावांपैकी अन्य नावांचा त्या त्या कार्याच्या उद्देशाने नामजप करू शकतो.
सर्वसामान्यपणे सूर्याचा जप करायचा झाल्यास ‘श्री सूर्याय नमः ।’ हा प्रचलित नामजप करावा.
हेच तत्त्व अन्य देवतांच्या संदर्भातही अनुसरावे. विष्णु, शिव, दत्त, मारुति, गणपति, देवी अशा सर्वच देवतांची त्यांच्या विविध रूपांनुसार ती ती नावे आहेत; कारण त्यांची अनेकविध कार्ये आहेत आणि त्या कार्यानुरूप त्यांची विविध रूपे प्रकट झालेली आहेत. त्यामुळे एखादे विशिष्ट कार्य सिद्धीस जाण्यासाठी त्या विशिष्ट देवतेची शक्ती हवी असल्यास, त्या देवतेच्या त्या विशिष्ट रूपाची उपासना करावी लागते आणि त्या उपासनेत त्या देवतेच्या त्या रूपाचा नामजपही करावा लागतो, उदा. ज्ञानशक्ती हवी असल्यास श्री सरस्वतीदेवीची उपासना आणि तिचा ‘श्री सरस्वतीदेव्यै नमः ।’ हा नामजप करावा.
धनसमृद्धी हवी असल्यास श्री लक्ष्मीदेवीची उपासना आणि तिचा ‘श्री लक्ष्मीदेव्यै नमः ।’ हा नामजप करावा इत्यादी. याउलट देवीचे सर्वसामान्य तत्त्व हवे असल्यास श्री दुर्गादेवीची उपासना आणि ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप करावा. याप्रमाणेच श्रीविष्णूचा ‘श्री विष्णवे नमः ।’, शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’, दत्ताचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ मारुतीचा ‘श्री हनुमते नमः ।’ आणि गणपतीचा ‘श्री गणेशाय नमः ।’, असे सर्वसामान्य नामजप आहेत.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.१०.२०२३)