आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय !

मुलावर रॅगिंग (छळ) करून त्याची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप !

गौहत्ती (आसाम) – आयआयटी गुवाहाटीचा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलावर रॅगिंग (छळ) केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हा विद्यार्थी बिहारमधीला समस्तीपूर जिल्ह्यातील मोहनपूर गावचा रहिवासी होता.

१. पोलिसांनी सांगितले की, १० एप्रिलच्या सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृताचा मित्र महाविद्यालयात गेला असतांना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल मिळाल्यावरच अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

२. मृताच्या वडिलांनी मात्र ही हत्या असल्याचे म्हटले असून आयआयटीच्या निष्काळजीपणामुळे असे घडल्याचे सांगत त्यांनी आयआयटीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. ते म्हणाले की, ही स्पष्टपणे हत्या आहे; पण आयआयटी प्रशासन त्याचे आत्महत्येत रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मुलावर अनेक वेळा रॅगिंग करण्यात आले. याविषयी त्याने तक्रारही केली होती; मात्र संस्थेने त्याकडे दुर्लक्ष केले.

सौजन्य Northeast Media Hub

३. संस्थेने या अद्याप आरोपांना उत्तर दिलेले नाही; परंतु विद्यार्थ्याच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला असून कुटुंबाला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

४. जानेवारी मासात आयआयटी गुवाहाटीच्याच चौथ्या वर्षात शिकणार्‍या एका विद्यार्थिनीचाही एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते.