(म्हणे) ‘चीन-भारत संबंध शांतता आणि विकास यांसाठी अनुकूल !’ – माओ निंग, प्रवक्ते, चीन
पंतप्रधान मोदी यांच्या चीनविषयीच्या सकारात्मक विधानावर चीनची प्रतिक्रिया !
बीजिंग (चीन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनविषयी केलेल्या विधानावरून चीनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, ‘‘चीनने पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची नोंद घेतली आहे. या प्रदेशात अन् त्यापलीकडे भक्कम आणि स्थिर चीन-भारत संबंध शांतता अन् विकास यांसाठी अनुकूल आहेत.’’ ‘राजकीय आणि सैन्य पातळीवर सकारात्मक आणि रचनात्मक द्विपक्षीय योगदानामुळे दोन्ही देश त्यांच्या सीमांवर शांतता आणि स्थिरता राखण्यात सक्षम होतील’, असे अमेरिकी नियतकालिक ‘न्यूजवीक’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.
१. सीमा संघर्षाविषयी बोलतांना प्रवक्ते माओ म्हणाले की, केवळ हेच चीन-भारत संबंधांचे सत्य आहे, असे समजता येणार नाही; कारण आमचे संबंध फार व्यापक आहेत. सीमा विवाद द्विपक्षीय संबंधांमध्ये योग्यरित्या ठेवला गेला पाहिजे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.
२. चीनच्या अधिकृत माध्यमांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. सरकारी मीडिया संस्था ‘चायना डेली’ने म्हटले की, एक स्वागतार्ह पाऊल म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ शेजारी देशांनी त्यांच्या दीर्घकालीन सीमावादांचे ‘त्वरित’ निराकरण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे चीन आणि भारत यांच्यातील शांततापूर्ण अन् स्थिर संबंधांच्या विकासाला चालना मिळू शकते. मोदी यांच्या ताज्या टिप्पण्यांना सद्भावनेचे संकेत मानले जाऊ शकते; कारण दोन्ही बाजू त्यांच्या सीमावादांवर लवकरात लवकर योग्य, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.’
संपादकीय भूमिकाचीनचा भारतासमवेतचा इतिहास पहाता तो विश्वासघातकीच असल्याचे दिसतो. त्यामुळे भारत चीनसमवेत कधीही सकारात्मक विचार करून गाफील राहू शकत नाही ! |