Canada Indian Staff Removed : कॅनडाच्या राजनैतिक कार्यालयांतूून भारतीय कर्मचार्यांना काढून टाकले !
भारताने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकार्यांच्या केलेल्या हकालपट्टीला कॅनडाचे प्रत्युत्तर !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाने भारतातील त्याच्या राजनैतिक कार्यालयांत काम करणार्या अनेक भारतीय कर्मचार्यांना काढून टाकले आहे. तसेच चंडीगड, मुंबई आणि बेंगळुरू येथील कॅनडाच्या वाणिज्य दूतावासातील सर्व कर्मचार्यांनाही काढून टाकले आहे. या संदर्भात कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या जनसंपर्क कार्यालयाने म्हटले की, भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी भारताने कॅनडाला त्याच्या ६२ पैकी ४१ मुत्सद्दींना परत बोलावण्यास सांगितले होते. दोन्ही देशांच्या राजनैतिकांची संख्या समान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. ‘भारतात उपस्थित असलेले कॅनडाचे अतिरिक्त मुत्सद्दी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करतात’, असा आरोप भारताने केला होता.
भारतात आमच्या नागरिकांना सेवा देणे चालूच ठेवू ! – कॅनडा
‘आम्ही भारतात आमच्या नागरिकांना सेवा देणे चालूच ठेवू. कॅनडात शिकण्यासाठी, काम करण्यासाठी किंवा रहाण्यासाठी भारतीय नागरिकांचे स्वागतही आम्ही करत राहू.’ – कॅनडाचे उच्चायुक्त