Hinduphobia Resolution : हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधाचा अमेरिकी संसदेत ठराव !
वॉशिंग्टन – अमेरिकेतील हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या आणि हिंदुद्वेषाच्या घटनांचा तीव्र निषेध करणारा ठराव अमेरिकन संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. यापूर्वी भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, एमी बेरा आणि प्रमिला जयपाल यांनी न्याय विभागाला पत्र लिहून हिंदु मंदिरांवरील आक्रमणाविषयी अन्वेषणाची माहिती मागितली होती.
प्रस्तावात म्हटले आहे की,
१. अमेरिकेच्या प्रगतीत हिंदु अमेरिकी समुदायाचे महत्त्वाचे योगदान आहे; मात्र असे असतांनाही हिंदूंना पूर्वग्रहाला सामोरे जावे लागत आहे.
२. ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन’च्या (एफ्.बी.आय.च्या) अहवालानुसार अमेरिकेत हिंदूंच्या विरोधात द्वेषपूर्ण गुन्हे आणि मंदिरांवरील आक्रमणाच्या घटना वाढल्या आहेत.
३. अमेरिकेत अनुमाने ४० लाख हिंदू आहेत. या समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या आणि प्रत्येक औद्योगिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
४. न्यूयॉर्कपासून कॅलिफोर्नियापर्यंत मंदिरांवर आक्रमणाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत रहाणार्या हिंदु समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिकेतील हिंदु खासदारांच्या प्रयत्नांमुळे अमेरिकी संसदेत तेथील मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधार्थ प्रस्ताव मांडला जातो, हे अभिनंदनीय आहे. भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी धर्मरक्षणार्थ संघटित होऊन अशी कृती करतात ? |