पुणे येथे बनावट ‘चारित्र्य प्रमाणपत्र’ देणारा गणेश कुंजकर अटकेत !
५०० रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण
पुणे – पोलीस पडताळणीचे बनावट ‘चारित्र्य प्रमाणपत्र’ सिद्ध करणार्या भुईंज (जिल्हा सातारा) येथील आरोपी गणेश कुंजकर या तरुणास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तो प्रमाणपत्रे सुरक्षारक्षक, कामगार यांना ५०० रुपयांमध्ये सिद्ध करून देत होता. त्याच्याकडून भ्रमणसंगणक, भ्रमणभाष आणि ५१ बनावट प्रमाणपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. (समाज गुन्हेगारीकडे अधिक प्रमाणात वळत असल्याने समाजाला असलेली धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात येते ! – संपादक)
आरोपी गणेश हा २ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात खासगी आस्थापनामध्ये काम करत होता. सुरक्षारक्षकांना मागणी अधिक असल्याने त्याने सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम चालू केले; परंतु त्यासाठी पोलिसांचे ‘चारित्र्य प्रमाणपत्र’ आवश्यक असल्याचे लक्षात आले. मूळ प्रमाणपत्रांमध्ये पालट करत त्याने बनावट प्रमाणपत्रे काहींना सिद्ध करून दिल्याचे अन्वेषणातून पुढे येत आहे.