इफ्तार पार्टीसाठी आलेल्या दुकानात दंगा झाल्याने मुनव्वर फारूकी याच्यावर काढता पाय घेण्याची वेळ !
मुसलमानांमध्ये आपापसांत दंगा झाल्याचा प्रकार !
मुंबई – हिंदुविरोधी वक्तव्य करणारा हास्य कलाकार मुनव्वर फारूकी ९ एप्रिल या दिवशी महंमद अली रोड येथे एका मिठाईच्या दुकानात इफ्तार पार्टीसाठी आला होता. तेव्हा काही जणांनी त्या दुकानावर अंडी फेकल्याने घटनास्थळी मोठा वाद झाला. त्यामुळे मुनव्वर फारूकी याला काढता पाय घ्यावा लागला. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात एक हॉटेल व्यावसायिक आणि त्याचे कामगार अशा ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुनव्वर फारुकी याला मिनारा मशीद येथील एका मिठाईच्या दुकानात इफ्तार पार्टीसाठी बोलावण्यात आले होते; मात्र फारूकी अन्य दुकानात गेला. त्यामुळे ज्या दुकानदाराने त्याला बोलावले होते, त्याला राग आला आणि त्याने फारूकी ज्या दुकानात गेला, त्या दुकानावर अंडी फेकली. त्यामुळे तेथील मुसलमानांमध्ये आपापसात दंगा झाला. एकूणच कार्यक्रमाचा बोजबारा उडाल्याने फारूकीला इफ्तार पार्टी सोडून जावे लागले. वर्ष २०२१ मध्ये हिंदूंच्या देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्याला १ मास कारवास भोगावा लागला होता.