‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःच्या कृतीतून साधकाला साधनेत कसे घडवतात ?’, याविषयीचा एक प्रसंग !
‘१५.१०.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीनिमित्त ‘काली याग’ करण्यात आला. त्या यागाला उपस्थित असतांना मला आठवले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ थकवा असतांनाही पूर्वी कधीतरी ते थोडा वेळ यागाला उपस्थित असायचे. यज्ञस्थळी येण्यापूर्वी ते प्रथम आश्रमातील स्वागतकक्षाजवळ असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे अत्यंत नम्रतेने आणि भावपूर्ण दर्शन घ्यायचे. त्यानंतर ते स्वागतकक्षाच्या समोरील सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घ्यायचे.
त्यानंतर ते श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे आणि सर्वांत शेवटी ते श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यायचे. परात्पर गुरु डॉक्टर या सर्व कृती शांतपणे, एकाग्रतेने, नम्रतापूर्वक, आदराने आणि भावपूर्ण करत असत.’
हे सर्व आठवल्यावर मला प्रश्न पडला, ‘परात्पर गुरु डॉक्टर स्वतः ईश्वर आहेत. त्यांना वरील कृती करण्याची आवश्यकता आहे का ?’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘या सर्व कृती ते मला शिकवण्यासाठी करत आहेत.’
त्यानंतर मी लगेच परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणे प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र यांना भावपूर्ण वंदन केले अन् श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतले. त्यामुळे मला देवता आणि गुरु यांच्या चैतन्याचा लाभ झाला, मला त्यांच्याविषयी आदर अन् प्रेम वाटू लागले, तसेच माझ्या मनाला स्थिरता जाणवू लागली.
वरील प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्या प्रत्येक कृतीतून साधकाला घडवत असतात’, हे मला शिकायला मिळाले आणि ‘मला असे गुरु लाभले’, याबद्दल माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)