शिक्षक किंवा अध्यापक, आचार्य आणि गुरु यांच्यातील भेद अन् गुरूंची लक्षणे !

‘आमच्या पूर्वजांची ही दृढ श्रद्धा की, महर्षि व्यासांसारखी वेदमर्मज्ञ, ब्रह्मज्ञानी आणि विश्वहितैषी व्यक्तीच ‘आदिगुरु’ होऊ शकते किंबहुना ‘गुरु’ या संकल्पनेचे मूर्त रूप, म्हणजेच महर्षि व्यास ! त्यांची ही श्रद्धा-अंधश्रद्धा नव्हती, तर व्यासांचे अतुलनीय सामर्थ्य आणि कर्तृत्व प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरची ती तर्कशुद्ध प्रतिक्रिया होती. त्यामुळे त्यांनी त्या दोहोंचे समीकरणच केले आणि ‘व्यासपौर्णिमा’ मग ‘गुरुपौर्णिमा’ झाली. त्या दिवशी गुरूंचे विधीवत् पूजन करण्याची प्रथा पडली; परंतु काळाच्या ओघात काही शब्द त्यांचे सांस्कृतिक मूल्यच हरवून बसतात ! ‘गुरु’ या शब्दाचेही काहीसे तसेच झाले आहे. आज जेव्हा ‘गूगल गुरु’ किंवा ‘अच्छे गुरु हो यार !’, अशी शब्दावली कानावर पडते, तेव्हा प्रकर्षाने जाणवते की, ‘गुरु’ संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

१. ‘जो ज्ञान देतो तो गुरु’, एवढ्यावरच गुरु शब्दाची व्याप्ती नसून ‘गुरु’ शब्दाला दिव्य वलय असणे

काही दशकांपूर्वी शालेय शिक्षकांना ‘गुरुजी’ म्हणून संबोधण्याचा प्रघात होता. त्यामागे हीच धारणा होती, ‘जो ज्ञान देतो तो गुरु.’ यामुळेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळा-महाविद्यालयांतील गुरुजनांना प्रणाम करणारा (२ टक्के का होईना) एक सश्रद्ध वर्ग आजही आढळतो. त्यांच्या मनात आणि ‘गूगल’ला गुरु म्हणण्यातही हीच भावना डोकावते की, ज्ञान देतो त्याला गुरु म्हणावे.

वस्तूतः या सर्वांत प्रथमदर्शनी तरी आक्षेपार्ह असे काही दिसत नाही. शिक्षकांप्रती आदरभाव असणे चांगलेच आहे; मग तो शिक्षक हाडामांसाचा मनुष्यप्राणी असो वा यंत्रावरचा (गूगल) असो ! फार तर अशांना ‘दीक्षागुरु’ न म्हणता ‘शिक्षागुरु’ म्हटले की झाले; पण मग प्रश्न उद्भवतो की, आपल्या संस्कृतीत ‘गुरु’ शब्दाला जे दिव्य वलय आहे, त्याच्याशी हे कितपत सुसंगत आहे ?

२. शिक्षक किंवा अध्यापक, आचार्य आणि गुरु यांमध्ये नेमका भेद काय आहे ?

अ. शिक्षक किंवा अध्यापक : स्वतःची उपजीविका व्हावी म्हणून शिकवणारे. ते विद्या-दान करत नाहीत, तर विद्या विकतात.

आ. आचार्य : विषय शिकवतात, तसेच स्वतःच्या आचरणातूनच विद्यार्थ्यांना घडवतात. सचोटी, निष्कलंक आणि चारित्र्य इत्यादी गुणांचाही बोध विषयांसह करून देतात.

इ. गुरु : ‘स गुरुर्यः क्रियाः कृत्वा वेदमस्मै प्रयच्छति ।’ (याज्ञवल्क्यस्मृति, अध्याय १, श्लोक ३४), म्हणजे ‘जो उपनयनादी संस्कार करून नंतर वेदांचेही ज्ञान देतो तो गुरु.’  शिष्यांकडून गुरूला खरी अपेक्षा असते की, हा एक ‘योग्य माणूस’ बनावा. पैशाच्या रूपाने प्रत्युपकाराची अपेक्षा गुरु ठेवत नाही; म्हणूनच शिक्षकाचा ‘विद्यार्थी’, तर गुरूंचा ‘शिष्य’ (अनुशासनात रहाणारा) असतो आणि आचार्यांचा ‘छात्र’ (छत्र धरून गुरूंची पर्यायाने समाजाची – सेवा करणारा) असतो.

३. परा आणि अपरा विद्या यांनुसार शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक अन् गुरु यांतील भेद

ऐहिक जीवन सुखमय बनवण्यासाठी ‘अपरा विद्या’ आणि वैश्विक सत्याच्या आकलनाद्वारे ब्रह्मानंद मिळवून देते ती ‘परा विद्या.’ आजच्या भाषेत सांगायचे, तर विद्यापिठातून शिकवले जाणारे विषय रसायन, भौतिकी इत्यादी विज्ञान शाखेचे, शरीरविज्ञान आदी आयुर्वेदाचे; गणित, अर्थशास्त्र वाणिज्य शाखेचे किंवा काव्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्रादि विषय म्हणजे ‘अपरा विद्या’, अशी अपरा विद्या देणार्‍याला शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक म्हणता येईल; पण गुरु मात्र तोच की, जो गूढ तत्त्वाचा बोध करू शकेल, ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालून शिष्याच्याही मनात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ उमलवू शकेल; मग त्यावरून समीकरण मांडता येईल की,

अ. चांगला शिक्षक : पाठ्यविषयात उत्कृष्ट गुण मिळवून देणारा      आ. चांगला आचार्य : स्वतःच्या वर्तनाने सदाचरण शिकवणारा

इ. चांगला गुरु : नराचा नारायण करण्याची क्षमता असणारा

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः…’, हा श्लोक बहुतेकांना तोंडपाठ असतो. तेथे गुरुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश म्हटले आहे. हे कसे काय ? कारण उघड आहे ! माता-पित्यांनी केवळ आपल्या देहाला जन्म दिला; पण त्या देहातील व्यक्तीत्व फुलवतो तो गुरुच ! म्हणून तो ब्रह्मा. परा विद्येचा मार्ग सोपा नाही. त्या मार्गातील अडथळे आपल्या उपदेशातून दूर करून अध्यात्मचिंतन सुलभ करून देतो; म्हणून तो गुरु पालनकर्ता विष्णु आणि मनातील षड्विकारांचा संहार करतो; म्हणून तो संहारकर्ता महेश. महर्षि व्यासांनी वेदविभाजनाद्वारे पुराण-लेखनांद्वारे ही तिन्ही कामे केली; म्हणून ते ‘गुरु’ संकल्पनेचा मानदंड (आयकॉन) बनले.

४. गुरु आणि गुरुजन यांतील भेद

तसे पाहिले, तर ‘गुरु’ या शब्दाचा ‘मोठा’ (वयाने, आकाराने, वजनाने) असाही अर्थ आहे. त्यानुसार वडिलधार्‍यांना ‘गुरुजन’ म्हटले जाते. आकाराने सर्वांत मोठा असणार्‍या ग्रहाला ‘गुरु’ हे नाव दिले जाते आणि ‘गुरुत्वाकर्षणाच्या’ सिद्धांतातील गुरुत्व हे वजनावर अवलंबून असते. या कोशीय अर्थानुसार वडिलधार्‍यांना ‘गुरु’ म्हणून मान देणे योग्यच आहे. कवी कालिदासानेही शकुंतलेची सासरी पाठवणी करतांना कण्वमुनींच्या तोंडी ‘शुश्रूषस्व गुरुन्’ (वडिलधार्‍यांची शुश्रूषा करत जा.) असेच शब्द आहेत. तेव्हा वडिलधारे गुरुजन आणि अध्यापकगण हे सदैव वंदनीयच आहेत; पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र सश्रद्ध अंतःकरणाने पूजन करायचे ते व्यासतुल्य व्यक्तींचेच !

५. अवधूताने (भगवान दत्त) केलेले २४ गुरु हे गुरूच असल्याचे त्यांनी स्वतः सांगणे

शाळा -महाविद्यालयांतील अध्यापक तेथे अभिप्रेत नाहीत – नसावेत; कारण त्यांचे वय, आकार आणि वजन यांचा येथे काहीच संदर्भ नाही. आता तर त्यांच्यासाठी ‘टीचर्स डे’चेही (शिक्षक दिनाचेही) प्रावधान (तरतूद) आहे. येथे कुणी शंका काढू शकेल की, ‘श्रीम‌द्भागवता’त अवधूताचे जे २४ गुरु सांगितले आहेत, त्याची संगती कशी लावायची ?

‘एते मे गुरवो राजन् चतुर्विंशतिराश्रिताः ।’ (श्रीमद्भागवत, स्कंध ११, अध्याय ७, श्लोक ३५), म्हणजे ‘हे राजा, मी या २४ गुरूंचा आश्रय घेतला आहे.’ असे शब्द अवधूतांच्या मुखातून महर्षि व्यासांनी वदवले, तर मग आम्हीही अध्यापकांस ‘गुरु’ का मानू नये ? असा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.

याचे उत्तर भागवतातच आहे. वस्तूतः ‘उद्धरेत् आत्मनाऽत्मानम् ।’

म्हणजे ‘स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो’, हा उपदेश स्वतः ‘गुरु’ बनून अवधूतांनी यदुराजाला केला आहे. प्रत्येकाच्या जीवनशैलीचे निरीक्षण करून त्यातून स्वतः काहीतरी शिकण्याची दृष्टी यदूला देण्यासाठी तो प्रसंग आहे. तेथे गुरु प्रत्यक्ष अवधूतच आहेत.

६. ‘गुरूं’ची व्याप्ती अन् लक्षणे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी नमन करायचे, ते असे आत्मभान देणार्‍या गुरूंचे.

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।

अर्थ : ब्रह्मरूप, आनंदरूप, परमोच्च सुख देणारे, केवळ ज्ञानस्वरूप, द्वंद्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे लक्ष्य (‘ते तू आहेस’, असे वेदवाक्य ज्याला उद्देशून आहे ते), एकच एक, नित्य, शुद्ध, स्थिर, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भावातीत, गुणातीत असलेल्या अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो.

या श्लोकातील ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीत, भावातीत त्रिगुणरहित आणि गगनसदृश्य (सर्वव्यापी असूनही निर्लिप्त) ही विशेषणेच ‘गुरूं’ची व्याप्ती अन् लक्षणे विशद करतात. अशा त्या व्यासतुल्य गुरूंना वंदन.’

– डॉ. लीना रस्तोगी

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै-सप्टेंबर २०२३)