Father Of God Particle : ‘गॉड पार्टिकल’चे संशोधक ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे ९४ व्या वर्षी निधन !
जगाच्या उत्पत्तीविषयी केले होते महत्त्वपूर्ण संशोधन !
लंडन (इंग्लंड) – ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ आणि ‘गॉड पार्टिकल’च्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले वैज्ञानिक पीटर हिग्ज यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी ‘हिग्ज-बोसॉन कण’, म्हणजेच ‘गॉड पार्टिकल’चा शोध लावला होता. या शोधामुळे महास्फोटानंतर (‘बिग बँग’नंतर) विश्वाची, म्हणजेच जड वस्तूची निर्मिती कशी झाली ?, हे स्पष्ट होऊ शकले. या शोधासाठी त्यांना वर्ष २०१३ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
सौजन्य : WION
त्यांच्या मृत्यूची माहिती देतांना एडिनबर्ग विद्यापिठाने सांगितले की, पीटर यांनी आजारपणानंतर ८ एप्रिल या दिवशी त्यांच्या घरी शेवटचा श्वास घेतला. या विद्यापिठात ते अनेक वर्षे प्राध्यापक होते.
हिग्ज यांच्या संशोधनाचा संक्षिप्त मागोवा !
‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, वर्ष १९६० च्या दशकात हिग्ज आणि इतर भौतिकशास्त्रज्ञ यांनी विश्व कशापासून बनले आहे ?, हे समजून घेण्याचा प्रयत्न चालू केला. हिग्ज यांनी त्या काळी लिहिलेला शोधप्रबंध वर्ष १९६४ मध्ये प्रकाशित झाला; परंतु तो त्या काळी अनेकांना समजला नव्हता. वर्ष २००६ मध्ये ते एडिनबर्ग विद्यापिठातून निवृत्त झाले. वर्ष २०१२ मध्ये हिग्ज यांच्या संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांनी अंतत: प्रत्यक्ष माहिती मिळवली. त्याला ‘हिग्ज बोसॉन’ असे नाव देण्यात आले. ४ जुलै २०१२ या दिवशी या कणाच्या अस्तित्वाची पुष्टी झाल्याची घोषणा करण्यात आली. वर्ष २०१२ पर्यंत हा कण विज्ञानाची केवळ एक संकल्पना होती.
पीटर हिग्ज यांचा जन्म १९२९ मध्ये न्यूकॅसल येथे झाला. शालेय शिक्षणानंतर हिग्ज यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. त्या वेळी त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा (‘थियोरॉटिकल फिजिक्स’चा) नवा पर्याय निवडला. नोबेल पारितोषकासह त्यांना अनेक प्रथितयश पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
‘गाडॅ पार्टिकल’ आणि भारत !‘गॉड पार्टिकल’च्या शोधात भारताचेही योगदान आहे. ‘हिग्ज बोसॉन’ या नावात ‘हिग्ज’ हे नाव पीटर हिग्ज यांचे आहे. त्यासह ‘बोसॉन’ हे नाव भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावाशी संबंधित आहे. जुलै २०१२ मधील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ वृत्तपत्राच्या लेखात बोस यांचे वर्णन ‘फादर ऑफ गॉड पार्टिकल’ असे करण्यात आले होते. तत्कालीन कलकत्ता येथे १९ व्या शतकात जन्मलेले सत्येंद्र बोस यांनी ‘क्वांटम मेकॅनिक्स’ आणि गणितीय भौतिकशास्त्रात उल्लेखनीय कामगिरी केली. बोस यांनी ‘क्वांटम स्टॅटिस्टिक्स’वर एक शोधनिबंध लिहून तो वर्ष १९२४ मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांना पत्र लिहून पाठवला. बोस यांच्या कार्याचे महत्त्व समजून आईन्स्टाईन यांनी ते एका जर्मन जर्नलमध्ये प्रकाशित केले. याच जर्नलमध्ये ‘बोसॉन’ हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला होता. सत्येंद्र नाथ बोस यांच्या शोधाचे नाव स्वतः आईन्स्टाईन यांनी ‘बोसॉन’ असे ठेवले. बोस यांना ‘पद्मविभूषण’ हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. |
‘हिग्ज बोसॉन’चे महत्त्व !
‘बीबीसी’च्या अहवालानुसार लिव्हरपूल विद्यापिठामध्ये कण भौतिकशास्त्र (पार्टिकल फिजिक्स) शिकवणार्या तारा सीअर्स म्हणतात, ‘‘हिग्ज बोसॉन कणांना वजन देतो. हे अगदी सामान्य वाटते; पण जर कणांचे वजन नसते, तर तारे सिद्ध झाले नसते. आकाशगंगा नसत्या आणि अणू नसते, तर विश्व काहीतरी वेगळेच असते.’’