जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेरच्या पदार्थांऐवजी घरचे आणि पारंपरिक अन्न खा !
आपणिकान्न म्हणजे (आपणिक – दुकान वा उपाहारगृह इत्यादी) जिथे अन्न, वस्तू यांचा विनिमय होतो. असे अन्न हे आयुर्वेदानुसार त्रिदोषकारक सांगितले आहे, म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तीनही वाढवणारे की, जे स्वास्थ्यासाठी मुळीच योग्य नाही.
दुकानात अन्न सिद्ध करणार्यांची मन:स्थिती, स्वच्छता, दर्जा, ताजेपणा इत्यादी अन्न खाणार्यांसाठी पोषक असेलच असे नाही. अर्थात् याला सन्माननीय अपवाद असतीलच; पण बहुतांशी असेच दिसते. आता तर संपूर्ण स्वयंपाक बाहेरून आणला जातो. तयार किंवा चिरलेल्या भाज्या, पोळ्या इत्यादी बाहेरूनच आणले जाते, नाममात्र फोडणी घातली जाते. अर्थात् ‘वेळेला, भुकेला मिळेल ते गोड’, अशीही काहींची परिस्थिती असते; पण होता होईतो बाहेर खाणे टाळावे.
१. बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
सध्या वैद्य किंवा आधुनिक वैद्य यांच्याकडे येणारे बहुतेक सगळे रुग्ण बाहेरचे खात असतात. नाईलाज म्हणून नव्हे, तर हौस म्हणून. कोविड महामारीनंतर बाहेर खाण्याचे प्रमाण पुन्हा प्रचंड वाढले आहे. खाऊ गल्ल्या, शनिवार-रविवार या दिवशी ओसंडून वहाणारी उपाहारगृहे, उपाहारगृहातील अन्नपदार्थ घरोघरी पोचवणारे ‘स्विगी’, ‘झोमॅटो’ यांचा वाढता धंदा, शिजवण्यासाठी तयार भाज्या, तयार मसाले, पदार्थ टिकवण्यासाठी वापरण्यात येणारे परिरक्षक (प्रिझर्व्हेटिव्ह), तसेच त्यातील आरोग्याला वाईट असे ‘ब्लीच’ केलेले पदार्थ, मैदा, अतीमीठ, साखर, रिफाईंड केलेले पामतेल, सरकीचे तेल, मक्याचे सिरप, कृत्रिम गोडवा आणणारे घटक असे अनेक घटक आणि स्वास्थ्य यांचे गुणोत्तर उलटे आहेच. यामुळेच ‘इनो’ (खायचा सोडा) आणि ‘कायम चूर्ण’ यांसारखी विज्ञापने अनेक ग्राहक आकर्षित करत असतात. ‘ही किंवा अशी स्वत:च्या मनाने घेतली जाणारी औषधे, म्हणजे स्वास्थ्याच्या उतरत्या पायरीवर आपण उभे आहात’, याची खूण आहे. पुढे किती घसरायचे (किंवा अजिबात घसरायचे नाही), याची मर्यादा प्रत्येकाने ठरवायची आहे. ‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथातही परान्न घेतल्यावर आरोग्यावर होणार्या भयंकर परिणामांची उदाहरणे आहेत.
२. बाहेरच्या पदार्थांमुळे पदार्थांची मूळ चव आणि ओळख हरवलेली असणे
खरी भूक असेल, तर मूठभर अन्न शिजवायला काही अडचण येत नाही. बाकी चोचले, हे स्वत:च्या ३ इंची जिभेच्या गरजेसाठी नाही, तर हाव असते, म्हणून खात असतात, हे सत्य आहे. ‘बाहेर घरच्यासारखे अन्न आणि घरी बाहेरच्यासारखे करायचा प्रयत्न’, हे मोठे विनोद आहेत. पंजाबी मूळ पदार्थात कांदा, टोमॅटो, आले आणि लसूण फार अल्प असतात. ते प्रत्येक पदार्थात असतातच, असे मुळीच नाही. पनीर क्वचित् आणि चिज नसते. क्रीम क्वचित् असते; पण आज बाहेर मिळणारा कोणताही पदार्थ याखेरीज पूर्ण होत नाही. यावरूनच आपण पदार्थांची मूळ चव आणि ओळख हरवत चाललो आहोत, हे कटुसत्य आहे.
इथे आपला हिंदु धर्म, संस्कृती, देश, काल इत्यादींच्या वैविध्यांसह मूळ कृती साहित्य मिळाले, तर योग्य होईल, असे मला वाटते. खायच्या सोड्याखेरीजही ढोकळा उत्तम बनवता येतो. मूळ चव, घटक, ओळख जपायला हवी हे महत्त्वाचे आणि ते घरी केल्यानेच होईल ! बाहेर खातांना ती अपेक्षा ठेवता येत नाही. सध्या आता स्वयंपाकघरात पूर्वीसारखी उठाठेव करावी लागत नाही. पदार्थ करण्यासाठी बरेचसे घटक तयार मिळतात. मिक्सर आणि कुकर यांसारखी यंत्र अन् भांडी मिळतात. त्यांचा वापर केल्यामुळे पदार्थ किंवा जेवण बनवणे आता उलट सोपे झाले आहे. म्हणून शक्यतो पैसे वाचवणे, दर्जा टिकवणे, स्वच्छता पाळणे, घरच्या सर्वांना पटेल आणि रुचेल अशा चवीचे पदार्थ बनवणे, यासाठी घरीच सकस ताजे अन्न पदार्थ शिजवावेत हे उत्तम ! यात घरातील सर्वांचे हक्काने साहाय्य घ्यावे. सगळ्यांनी किंवा ज्यांचा पाककृती करण्यात हातखंडा आहे, अशांनी घरातील इतरांना शिकवणे, हे यानेच साध्य होणार आहे.
३. आंतरराष्ट्रीय पदार्थांपेक्षा घरगुती पदार्थांची प्रतिदिन अधिक विक्री होत असणे
याचा अर्थ आपण बाहेर खाऊच नये का ? तर ते प्रत्येकाने स्वतःची तब्येत आणि ऐपत, पुढे होणारे दुष्परिणाम, त्यांचे उत्तरदायित्व यांचा विचार करून मगच ठरवावे. माझ्या मते तर आरोग्य आधी मग सगळे ! ४ पदार्थ कमी खाल्ले, तरी चालतील; पण जे खाऊ ते सत्त्वयुक्त, ताजे आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले असावेत, असे वाटते. सध्या आंतरराष्ट्रीय पाककृतींपेक्षा वा पदार्थांपेक्षा घरगुती पदार्थ प्रतिदिन अधिक विक्री होतात. निदान दुपारी तरी बर्गर, पिझ्झा यांपेक्षा पोळी, भाजी, आमटी आणि भात खाणारे अधिक जण आहेत, हेही नसे थोडके ! सण, समारंभ यांत आपले मुख्य पारंपरिक घटक अधिक असतात किंबहुना अजूनही असतात, हे नशीबच म्हणायचे.
४. बाहेरचे खाणे हौस म्हणून क्वचित्, एरव्ही घरीच अन्न करून खावे !
पूर्वी घरातील बायका मासिक पाळी आल्यावर बाजूला बसल्यावर शुचिता पाळण्यासाठी पुरुष स्वयंपाक करतच होते. याचाच अर्थ घरातील प्रतिदिन करायचे काही काम, काही विशेष कौशल्य किंवा पात्रता सोडल्यास सर्वांना येत होते. कोरोना महामारीची आपत्ती काहींसाठी इष्टापत्ती ठरली आणि स्वतः उठून पाणीही न घेणारी मुले स्वयंपाक अन् घरकाम करू लागली, यात कौतुकच आहे. विदेशात तर बाहेर मिळणारे महागडे, बेचव आणि िशळे अन्न आठवड्यातून एखाद वेळेस खाल्ले जाते, एरव्ही घरीच तीनही वेळचे अन्न पूर्वसिद्धता करून शिजवले जाते.
थोडक्यात काय, तर बाहेरचे खाणे हे हौस म्हणून क्वचित् व्हावे, एरव्ही घरीच करून खावे, यात दुमत नसावे.
५. बाह्य पदार्थांद्वारे थेट हिंदु संस्कृतीवर आक्रमण करण्याचे षड्यंत्र
कधीतरी हौस म्हणूनही ठीक आहे; कारण त्याखेरीज मूळ पदार्थ समजत नाही. जिथे जाऊ तिथे घरचेच अन्न मिळेल, असे नाही आणि स्थानिक पदार्थ खाल्ल्याखेरीज तेथील संस्कृती समजत नाही. सध्या ‘इंडो चायनीज’ ही नवीन पाककृती म्हणून उदयास आली आहे, ज्याचा मूळ चिनी पाककृतींशी संबंध नाही. आज भारतात अशी समजूत आहे की, बाहेर गाड्यांवर नेपाळी लोक शिजवतात तेच चायनीज.
फ्रेंच, इटालियन, जर्मन, स्पॅनिश या देशांतील लोक उलट त्यांच्या खाण्याविषयी फारच स्वाभिमानी आहेत. मूळ कृतीत नसलेला पदार्थ ते मिश्रणाच्या (‘फ्युजन’च्या) नावाखाली सुद्धा चुकूनही घालणार नाहीत. उच्चाराविषयी सुद्धा ते आग्रही असतात. बिर्याणी, कबाब आणि माखंडी करणारे शत्रू लोक थेट हिंदु संस्कृतीवर आक्रमण करतात अन् येथील लोक ते मिटक्या मारत त्यांचे गुणगान करतात. त्यामुळे हिंदु संस्कृती, पदार्थ आणि पद्धत यांवर भारतियांची पकड हवीच. ती पकड आपलेच पदार्थ घरी करत रहाण्यानेच येणार आहे. बाहेर विकतचे पदार्थ करण्यात अर्थकारण जपण्यासाठी आणि खप वाढवण्यासाठी तडजोडी या होणारच आहेत, उदाहरणार्थ ढोकळ्यात ‘इनो’ (खायचा सोडा) आणि इडलीत सोडा, जिलेबीत रंग घातला जाणार, हे उघड आहे.
६. तात्पर्य
घरचे आणि पारंपरिक अन्न ही स्वास्थ्य राखण्यासाठी प्राथमिक गरज आहे. बाकी बाहेरचे अनावश्यक खाणे, हे जिभेचे चोचले, जितके कमी तितके बरे !
– वैद्या तनुजा गोखले, पुणे. (३.४.२०२४)
(वैद्या तनुजा गोखले यांच्या फेसबुकवरून साभार)