साधकांनो, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण देणे, ही समष्टी साधना आहे’, हे लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण लिखाण थोडक्यात पाठवा !
‘सध्या अनेक साधकांकडून रामनाथी, गोवा येथील संकलन विभागाकडे विविध प्रकारचे लिखाण येते. पूर्वी साधकांनी दिलेले बहुतांश सर्व लिखाण प्रसिद्ध केले जात होते. सद्य:स्थितीत साधक संख्या वाढली आहे, तसेच नवनवीन उपक्रम, विविध सोहळे आणि अन्य विषय यांसंदर्भातील लिखाण येण्याचा ओघही वाढला आहे. जागेअभावी साधकांनी दिलेले सर्व आणि सविस्तर लिखाण प्रसिद्ध करणे शक्य होत नाही. त्यामुळे साधकांचे नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असे निवडक लिखाणच ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध केले जात आहे.
‘सनातन प्रभात’साठी संक्षिप्त आणि नाविन्यपूर्ण लिखाणच पाठवा’, अशी सूचना देऊनही बहुतांश साधक थोडक्यात लिखाण न पाठवता विस्तृत स्वरूपात पाठवतात. असे लिखाण निवडून, त्याचे संकलन करून, ते प्रसिद्ध करण्यायोग्य होण्यासाठी संकलन विभागातील साधकांना पुष्कळ वेळ द्यावा लागतो.
लिखाणातून ‘साधकांना साधनेची दिशा मिळावी, अध्यात्मातील पुढचे टप्पे समजावेत आणि अनुभूतींमुळे श्रद्धा वाढावी’, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना तळमळ असल्याने अन् त्यांच्या अपार कृपेमुळे साधकांचे लिखाण ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होते. अनेक साधकांना याविषयी गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता वाटते. काही साधक मात्र त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाल्यावर सर्व लिखाण न छापल्याबद्दल अप्रसन्नता व्यक्त करतात. ‘या लिखाणातून आमच्या भावना व्यक्त झाल्या नाहीत’, असे सांगून ‘आम्ही दिलेले सर्व लिखाण प्रसिद्ध करायला हवे होते’, अशी अपेक्षाही व्यक्त करतात.
साधकांनी दिलेले महत्त्वपूर्ण आणि सर्वांनाच शिकता येईल, असे निवडक लिखाण आपण दैनिकात अन् सविस्तर लिखाण संकेतस्थळावर प्रसिद्ध करतो अन् सर्वांपर्यंत पोचवतो. त्यामुळे साधकांनी ‘आपण लिखाण लिहून दिले; पण ते सर्व छापून आले नाही आणि आपले श्रम वाया गेले’, असा विचार न करता ‘काळानुसार साधकांसाठी जेवढे आवश्यक होते, ते सर्व छापून येत आहे’, असा विचार करावा. ‘साधकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लिखाण पाठवले, तर त्यातून त्यांची साधना होणार आहे’, हा विचार करून यापुढेही नाविन्यपूर्ण सूत्रे लिहून पाठवावीत.
‘आपले महत्त्वाचे लिखाण आवश्यक त्या माध्यमांतून, उदा. सनातन प्रभात, संकेतस्थळ, ग्रंथ आदींतून योग्य त्या वेळी प्रसिद्ध होणारच आहे’, हे लक्षात घेऊन साधकांनी यासाठी नित्य कृतज्ञ रहावे !’
– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.