प्रक्षोभक भाषणप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांवरील कारवाईविषयी न्यायालयाने मागितला अहवाल !
मुंबई – भाजपचे आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्या विरोधातील प्रक्षोभक भाषणाच्या प्रकरणाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित पोलीस आयुक्तांकडे अहवाल मागवला आहे. यासाठी न्यायालयाने १ आठवड्याची मुदत दिली आहे. येत्या १५ एप्रिल या दिवशी यावर सुनावणी होणार आहे.
आमदार गीता जैन यांच्यावरील कारवाईविषयी ठाणे पोलीस आयुक्तांकडे, तर आमदार नीतेश राणे यांच्यावरील कारवाईविषयी मुंबई पोलीस आयुक्तांकडे न्यायालयाने अहवाल मागवला आहे. आमदार गीता जैन यांनी मीरारोड येथे, तर आमदार नीतेश राणे यांनी गोवंडी आणि मालवणी येथे मुसलमानांच्या विरोधात भडकावू भाषण करूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याची फौजदारी रिट याचिका काही मुसलमानांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. आमदार गीता जैन आणि आमदार नीतेश राणे यांच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
संपादकीय भूमिका‘हिंदूंवरील अन्यायाची व्यस्था मांडणे’ ही प्रक्षोभक भाषणे आहेत कि वस्तूस्थिती ? याविषयी पोलिसांनी नि:पक्षपणे अहवाल सादर करावा ! |