गुरूंच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
बालीपूर धाम (जिल्हा धार, मध्यप्रदेश) येथे सद्गुरुदेव प.पू. गजानन महाराज बाबाजी यांच्या १०४ व्या जन्मोत्सवाचे आयोजन
बालीपूर धाम (मध्यप्रदेश) – संत दु:खाचे निवारण करून कृपा करतात; परंतु आपल्याला गुरूंजवळ सकाम इच्छा घेऊन न जाता मनुष्य जन्माचे सार्थक करण्याची इच्छा केली पाहिजे. गुरूंच्या शिकवणीचा प्रसार-प्रचार करणे, ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील अंबिका आश्रमामध्ये सद्गुरुदेव प.पू. गजानन महाराज यांच्या १०४ व्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित भक्तांना ते मार्गदर्शन करत होते.
सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘माझे गुरु माझ्याकडे सतत पहात आहेत, असे वाटणे’, हे शिष्यावस्थेचे लक्षण आहे. गुरूंचे आज्ञापालन हे त्यांचे खरे स्मरण आहे. त्यांच्या आज्ञापालनाने आपल्या आज्ञाचक्राचा भेद होतो.’’ या वेळी त्यांनी गुरु आणि शिक्षक, आई-वडील अन् गुरु यांच्यातील भेद आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शास्त्र समजून सण साजरे करणे आवश्यक !
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुसर्या दिवशी उपासनेसाठी आलेल्या महिलांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘आपण सप्तशतीचे पठण करतो. या उपासनेसमवेत आपल्याला स्वत:मध्ये, तसेच येणार्या पिढीमध्ये दुर्गामातेची निर्मिती करायची आहे. रक्षाबंधनाला भावाद्वारे बहिणीला मिळणारे संरक्षणाचे आश्वासन आणि भाऊबिजेच्या वेळी बहिणीकडून भावाच्या रक्षणाची होणारी प्रार्थना आज आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे हिंदु सण शास्त्र समजून साजरे करणे आणि येणार्या पिढीला त्याविषयी अवगत करणे आवश्यक आहे.’’
या प्रसंगी जनमानसाला उपासनेसाठी प्रवृत्त करणारे आणि संध्याकर्माविषयी जागृती करण्याचे महत्कार्य करणारे श्री १००८ सद्गुरु योगेशजी महाराज यांचा सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी सन्मान केला. यानिमित्त सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी श्री १००८ सद्गुरु योगेशजी महाराज यांना हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याची माहिती देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी श्री. रविंद्र शर्मा उपस्थित होते.
या वेळी श्री १००८ सुधाकर महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांना सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी भेटवस्तू दिली. श्री १००८ सुधाकर महाराज हे समितीच्या कार्याची माहिती ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना श्रीफळ अन् प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी समाधीस्थळ आणि मंदिर यांचे दर्शन घेतले. या प्रसंगी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या हस्ते विधीवत गुरुपादुका पूजन करण्यात आले.
क्षणचित्रे
१. कार्यस्थळी ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारासह सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे स्वागत केले.
२. कार्यक्रमस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.