नम्र आणि गुरुदेवांप्रती भाव असणारी पुणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. चैतन्या भूपेंद्र पाटील ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. चैतन्या भूपेंद्र पाटील हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)
चैत्र शुक्ल द्वितीया (१०.४.२०२४) या दिवशी कोथरूड, पुणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. चैतन्या भूपेंद्र पाटील हिला सनातन परिवाराकडून ११ व्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. नम्रपणा
‘कु. चैतन्या शाळेतील शिक्षिका किंवा शिकवणीच्या बाई यांच्याशी नम्रपणे बोलते. त्यामुळे ती घरी आणि शाळेत सगळ्यांची लाडकी आहे.
२. धार्मिक कृती करणे
तिला सात्त्विक पोशाख घालायला आणि कुंकू लावण्यास आवडते. ती नियमित अग्निहोत्र करते.
३. नामजप करणे
चैतन्या श्रीरामाचा नामजप करते. ती जपमाळ घेऊन नामजप करतांना तिच्या भोवती चैतन्यकण दिसतात.
४. आध्यात्मिक उपाय करणे
ती तिच्या वडिलांसमवेत श्रीरामरक्षा म्हणते आणि वास्तुदेवतेला प्रार्थना करते. ती अत्तर आणि कापूर लावण्याचे आध्यात्मिक उपाय करते.
५. स्वभावदोषांवर मात करणे
तिने ७ मासांपासून दूरदर्शन बघणे बंद केले आहे. पूर्वी चैतन्यामध्ये ‘विसरळूपणा आणि अव्यवस्थितपणा’ हे स्वभावदोष होते. त्यावर तिने स्वयंसूचना दिल्यावर तिच्यामध्ये ५० टक्के पालट झाला आहे.
६. चुका स्वीकारणे
ती बालसंस्कारवर्गाला नियमित उपस्थित रहाते. ती सत्संगात स्वतःच्या चुका सांगते. ती घरातील इतरांच्या चुकाही प्रेमाने सांगते.
७. सेवा
ती माझ्या समवेत ग्रंथवितरणाच्या कक्षावर सेवा करते, तसेच ती मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणात साहाय्य करते.
८. गुरुदेवांप्रती भाव असणे
ती सूक्ष्मातून गुरुदेवांशी बोलत असते. ‘प.पू. गुरुदेव तिच्याकडे बघत आहेत’, असे तिला वाटते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना तिची भावजागृती होते. ती रात्री झोपतांना सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या संदर्भातील ग्रंथ शेजारी ठेवते.
९. स्वभावदोष
भावनाशीलता, अव्यस्थितपणा, भित्रेपणा.’
– सौ. नीलिमा भूपेंद्र पाटील (कु. चैतन्याची आई), कोथरूड, पुणे. (२.११.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |