उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !
स्मशानभूमीमध्ये भूते दिसली नसल्याचा अंनिसच्या कार्यकर्त्यांचा दावा !
उरुळी कांचन (पुणे) : ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या पुणे शहर शाखेने उरुळी कांचनजवळील भवरापूर ग्रामपंचायतीच्या साहाय्याने ‘स्मशान भेट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भवरापूर गावाच्या स्मशानभूमीध्ये ‘अंनिस’च्या ५० कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला. तेथे सर्वांनी जेवण केले, स्वच्छता केली, गाणी गायली, चमत्काराचे प्रयोग सादर केले आणि रात्री स्मशानामध्येच मुक्काम केला. ‘आम्ही भूतांना साद घातली; परंतु भुते काही दिसली नाहीत’, असा दावा कार्यकर्त्यांनी केला.
भुताच्या कल्पनेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता ! – विशाल विमल, अंनिस
या वेळी अंनिसचे विशाल विमल म्हणाले, ‘‘स्मशानामध्ये अतृप्त आत्मे हे भुतांच्या स्वरूपात भटकतात. त्यांचा पांढरा वेश, उलटे पाय, तसेच उंच शरीरयष्टी असते’, हा समज काही खरा ठरला नाही. मानसिक अनारोग्य आणि इंद्रियजन्य भ्रम यांतून भूत असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना माणसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकासूक्ष्म जिवाणू किंवा विषाणू पहाण्यासाठी ज्याप्रमाणे ‘मायक्रोस्कोप’ यंत्राची आवश्यकता असते, त्याप्रमाणे भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! |