गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई !
कोल्हापूर : गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशी काही धर्मांधांनी टिपू सुलतानच्या समर्थनार्थ ‘स्टेटस’ ठेवले होते. या संदर्भात पोलिसांनी घेतलेल्या बोटचेपी भूमिकेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे भव्य आंदोलन केले होते. त्या आंदोलनाचा संदर्भ देत ८ एप्रिलच्या मध्यरात्री, म्हणजेच हिंदूंचा नववर्षारंभदिन असलेल्या गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनी २ हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी कह्यात घेतले. पोलीस प्रशासनाने एकूण ४० हिंदु कार्यकर्त्यांवर कारवाईची सिद्धता केली होती. ही गोष्ट विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना समजल्यावर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांना तात्पुरते नमते घ्यावे लागले.
या संदर्भात हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘गत वर्षी झालेल्या प्रकरणास ११ मास पूर्ण झालेले नसतांनाही पोलीस नव्याने ४० हिंदु कार्यकर्त्यांची नावे त्यात समाविष्ट करून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. २ दिवसांनी ‘ईद’ असून आमच्याकडेही काही जणांची नावे असून आम्ही ती पोलीस प्रशासनास देण्यास सिद्ध आहोत; मात्र पोलीस त्यांना नोटीस देणार का ?, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? हिंदूबहुल देशात आणखी किती दिवस हिंदूंवरच अत्याचार होणार ?’’