मुंबईत २ नवी पक्षीगृहे उभारणार !
मुंबई – मुलुंडजवळच्या नाहूर गावात पक्षीगृह (बर्ड पार्क) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एच्केएस् डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल’ हे आस्थापन हा प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे ५० कोटी रुपये खर्च करणार आहे. देशी-विदेशी पक्षी येथे असतील. या पक्षीगृहाचा मसुदा विकास आराखडा सल्लागाराने पालिकेला सादर केला आहे.
राणीबागेत देश-परदेशातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा विहार आहे. त्याला लागूनच असलेल्या मफतलाल मिलचा सुमारे दहा एकरचा भूखंड पालिकेला मिळाला आहे. या जागेत आधुनिक पद्धतीचे दुसरे पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. जुन्या पक्षीगृहात अतिरिक्त असलेले पक्षी मफतलाल भूखंडावरील प्रस्तावित पक्षीगृहात पाठवले जाणार आहेत. नव्या पक्षीगृहाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे.