वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?
‘वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून म्हणजे ९.४.२०२४ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ चालू होत आहे. हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ? याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.
१. हे संवत्सर कशासंबंधी फळ देईल ?
शालिवाहन शक १९४६ या संवत्सरात शनि ग्रह कुंभ राशीत असेल आणि गुरु ग्रह वृषभ राशीत असेल. कुंभ ही वायुतत्त्वाची आणि वृषभ ही पृथ्वीतत्त्वाची राशी आहे. या दोन्ही स्थिर स्वभावाच्या राशी आहेत. स्थिर स्वभावाच्या राशी राष्ट्राची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, कृषी, राष्ट्राचा भौतिक उत्कर्ष-अपकर्ष आदींसंबंधी फळे दर्शवतात.
२. देशातील कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण पालट होणे
कुंभ राशीतील शनि ग्रहामुळे देशातील कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण पालट होतील. शिक्षण, कृषी, मनोरंजन, वित्त, संसद, नागरी जीवन आदींच्या संदर्भात कायद्यांमध्ये पालट होतील. न्यायव्यवस्थेतील क्लिष्टता दूर होऊन लोकांना लवकर न्याय मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.
३. ‘क्रोधी’नाम संवत्सरात समाजात कलह आणि अशांतता निर्माण होणे
कायद्यांमध्ये होणार्या पालटांना समाजातील काही घटकांकडून विरोध केला जाईल. त्यामुळे सरकारला संघर्षातून जावे लागेल. या संवत्सराचे नाव ‘क्रोधी’ असल्यामुळे समाजात कलह आणि अशांतता निर्माण होईल.
४. नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण अल्प रहाणार असणे
शनि आणि गुरु हे ग्रह अनुक्रमे कुंभ आणि वृषभ या स्थिर स्वभावाच्या राशींमध्ये असल्यामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण अल्प राहील.
५. शेतकर्यांसाठी हे वर्ष लाभाचे असणे
गुरु ग्रह वृषभ राशीत असल्यामुळे या संवत्सरात पाऊस समाधानकारक पडून फळे, धान्ये आणि पिके पुष्कळ येतील. शेतकर्यांसाठी हे वर्ष लाभाचे असेल.
६. भारताची अर्थव्यवस्था प्रगतीच्या मार्गावर रहाणार असणे
गुरु ग्रह वृषभ या समृद्ध राशीत असल्यामुळे या संवत्सरात विकासकामांना गती येईल. रोजगारांत वाढ होईल. भारताची अर्थव्यवस्था प्रगतीच्या मार्गावर राहील. परराष्ट्रीय संबंध सुधारतील. भारताची प्रतिमा जगात आणखी उंचावून भारताचे जगातील स्थान बळकट होईल.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.३.२०२४)