आगामी हिंदु वर्षात हिंदूंचे राजकीय, मुत्सद्देगिरी आणि तांत्रिक सक्षमीकरण होईल ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
१. देशात विविध राज्यांमध्ये साजरे होणारे नववर्ष
‘आध्यात्मिक दृष्टीकोनातून जरी ‘काळ’ अनंत आणि अविभाज्य असला, तरी लौकिक अन् व्यावहारिक दृष्टीकोनातून आपल्या हिंदु-सनातनी ऋषिमुनींनी काळाला समतुल्य असलेला वेळ चतुर्युग (सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग), सहस्राब्दी, शतक, दशक, वर्ष, मास, दिवस, घटी, पल आणि विपल इत्यादींमध्ये विभागून वेळेची गणना योग्य पद्धतीत मांडली आहे.
चैत्र शुक्ल प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती चालू केली. तेव्हापासून कालगणनेची पद्धतही चालू झाल्याचा उल्लेख प्राच्य आणि ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये आढळतो. त्यामुळेच हिंदु नववर्षाचा प्रारंभ चैत्र-शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रीमध्ये आदिशक्ती भगवतीच्या उपासनेने होतो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदु नववर्षाचा प्रारंभ अत्यंत शास्त्रीय, नैसर्गिक आणि वैज्ञानिक आहे. हे नववर्ष देशातील विविध राज्यांमध्ये अन् हिंदु समाजामध्ये गुढीपाडवा (महाराष्ट्र/गुजरात), चेटीचंद (सिंधी समाज), युगादी (कर्नाटक), युगादी (आंध्रप्रदेश/तेलंगाणा), संवत्सरा पाडव (केरळ आणि गोव्यातील कोंकणी समुदाय), नवरेह (जम्मू-काश्मीर), साजिबू नोंगमा (मणीपूर), बैसाखी (पंजाब/हरियाणा), नबबर्ष (बंगाल), ज्योतिषदिन आदी नावांनी ओळखले आणि साजरे केले जाते. या वेळी संपूर्ण निसर्गात नवीन चेतना, नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साह पसरलेला असतो.
२. अंकशास्त्राच्या दृष्टीकोनातून आगामी हिंदु नववर्षाचा परिणाम
आगामी हिंदु नवीन वर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदा (९ एप्रिल २०२४) पासून हिंदु नववर्षाचा (संवत २०८१) प्रारंभ होईल. अंकशास्त्राच्या दृष्टीकोनातून आगामी हिंदु नववर्षाची संख्या २ आहे (२+०+८+१ = ११, १+१ = २), जी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून चंद्राशी संबंधित संख्या आहे. ‘चंद्रमा मनसो जात’, ९ ग्रहांपैकी चंद्राला ‘राणी’ संबोधून, ते आपले मन आणि भावना यांच्याशी जोडले गेले आहे. चंद्र हा पाणी, शांतता, मातृभूमी आणि सतत परिवर्तन यांचा कारक आहे. अशा परिस्थितीत अतीवृष्टी आणि जलप्रलय येण्याची शक्यता आहे. हिंदु समाजात भावनिकता अधिक असेल. समाज आणि राष्ट्र यांमध्ये झपाट्याने परिवर्तन होण्याची चिन्हे आहेत. भू-राजकीय परिस्थिती परिवर्तनीय आणि अस्थिर राहील. सनातनी हिंदु समाज मातृभूमीप्रती अधिक समर्पित असेल. राष्ट्र्रवादी शक्ती, देशभक्त आणि धर्मप्रेमी यांचे भावबल आणि मनोबल उत्तरोत्तर वाढेल.
३. आगामी हिंदु नववर्षातील ग्रहांची स्थिती
अ. बृहस्पति : नवीन संवत्सरामध्ये बहुतांश काळ ग्रहांचे गुरु बृहस्पति कालपुरुषाच्या कुंडलीत दुसर्या भावामध्ये (घरात) शत्रूराशी वृषभमध्ये राहील. बृहस्पतीची ही स्थिती लौकिक-पारलौकिक मिश्रित फळाकडे संकेत दाखवते. समाजात भौतिकवादाची वाढही दिसून येईल. हिंदु समाज आध्यात्मिकतेसह भौतिक आणि आर्थिक समृद्धी, तसेच यश यांच्याकडे वेगाने वाटचाल करील.
आ. शनि : नवीन वर्षात कर्माचा स्वामी शनि वर्षभर कालपुरुषाच्या कुंडलीतील एकादश भावात स्वराशी कुंभमध्ये राहील. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि राहू हे राजकारण, मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान आणि न्याय व्यवस्था यांचे कारक मानले जातात. आगामी हिंदु नववर्षात शनीची स्थिती हिंदु समाजाची राजकारण, मुत्सद्देगिरी आणि तांत्रिक सशक्तीकरण यांकडे संकेत देते. हिंदु समाजाला न्याय मिळेल आणि समाज मानसिकदृष्ट्या अधिक सशक्त होऊन त्याची श्रमशक्ती जागृत ठेवेल.
इ. राहू : नवीन संवत्सरामध्ये राहू ग्रहही वर्षभर कालपुरुषाच्या कुंडलीतील द्वादश (१२ व्या) भावात (घरात) मीन राशीत राहील आणि केतू कालपुरुषाच्या कुंडलीतील षष्ठ (६ व्या) भावात कन्या राशीत राहील. मीन राशी ही धर्माचा अधिष्ठाता ग्रह असलेल्या बृहस्पतीची राशी आहे आणि ज्योतिषशास्त्रात सर्वश्रेष्ठ राशी समजली जाते. राहूची ही स्थिती थोडे चढ-उतार यांसह राजकारण आणि मुत्सद्देगिरी यांना हिंदु धर्माच्या बाजूने आणि हितावह ठेवेल.
नवीन आणि प्रदीर्घ न्यायालयीन खटल्यांचे वाद निर्माण होतील आणि जुनी प्रकरणे हिंदूंच्या बाजूने निकाली निघतांना दिसतील. राहू तथाकथित धार्मिक लोकांचा ढोंगीपणाही उघड करील. धार्मिक क्षेत्रात कमालीचे चढ-उतार होण्याची शक्यता आहे. केतू रोग, कर्ज आणि शत्रुत्व वाढवू शकतो.
ई. अन्य ग्रह : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, इतर ग्रहांची स्थितीही अल्पकालीन स्वरूपात हिंदु समाजावर सकारात्मक स्वरूपात परिणाम करेल; कारण गुरु, शनि आणि राहू या प्रमुख ग्रहांची स्थिती सकारात्मक आहे. मला आशा आहे की, हिंदु नववर्ष सर्व सनातनी हिंदूंच्या जीवनात नवी चेतना, नवी ऊर्जा आणि नवा उत्साह यांचा संचार करील अन् हिंदु समाज परंपरेनुसार मानवतेला नवी दिशा देत राहील, तसेच अधिक सक्षम होईल.’
जयतु ! मंगलम् भवतु ! शुभमस्तु !