छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा !
महाराष्ट्रात सध्या जातीय अस्मिता फार टोकदार होऊ लागल्या आहेत. अशातच व्हॉट्सॲप, फेसबूक यांसारख्या सामाजिक माध्यमांतून पद्धतशीरपणे तरुणांची माथी भडकावण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. अशातच ज्यांना सत्य काय माहीत नसते, अशांना या सगळ्या गोष्टी खर्या वाटू लागतात आणि जातीजातींत आणखी तेढ निर्माण होते. अशापैकीच गुढीपाडवा जवळ आला की, उठणारी आवई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा मनुस्मृतीनुसार झाला आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारण्यास प्रारंभ केला. त्यामुळे गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण साजरा करू नये ! अर्थात् गुढीपाडव्याचे उल्लेख शंभूराजांच्या मृत्यूपूर्वीच्या अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत असल्याने असल्या गैरप्रचाराला बळी पडण्यास काही कारण आहे, असे वाटत नाही. गुढीपाडव्याचे वर्ष १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया.
विविध ग्रंथांमधील गुढीचा उल्लेख !
१. ‘शिवचरित्र साहित्य खंड १’ या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुक्ल १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच २४ नोव्हेंबर १६४९ या दिवसाचा असून सदर महजरात ‘गुढीयाचा पाडवा’ असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत, हे स्पष्ट दिसते.
२. ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २०’ (जुना खंड) या पुस्तकात पृष्ठ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडापत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रांतील संबंधित लिखाण असे – ‘शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क ॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.’ म्हणजे वर्ष १६३१-३२ मध्येसुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत, हे येथे स्पष्ट होते.
३. ‘श्री रामदासांची कविता खंड १’ या पुस्तकात पृष्ठ ९६ वर समर्थ रामदासस्वामी ‘श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा आल्यावर जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात- ‘ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।’ अर्थात् श्रीराम आल्यावर गुढ्या इत्यादी विषय बाजूला ठेवला, तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्यूपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने गुढ्या या महाराष्ट्राला नवीन नव्हत्या हे दिसते.
४. ‘शिवकालीन पत्रसारसंग्रह’ या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेले चैत्र शुक्ल ८ शके १५९६ म्हणजेच ४ एप्रिल १६७४ या दिवशीचे पत्र दिले आहे. या पत्रात नारायण शेणवी निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला, असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन मास आधी पाडव्याचा सण महत्त्वाचा होता, असे दिसते.
ज्ञानेश्वरीतील गुढीचा उल्लेख !
संत ज्ञानेश्वरांच्या (वर्ष १२७५-१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये,
अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ५२
अर्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवतो.
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी ५२
अर्थ : भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ऐक, जो संन्यासी आहे तोच योगी आहे, अशा दोन्ही मार्गांची एकवाक्यता असल्याची ध्वजा अनेक शास्त्रांनी या जगात उभारली आहे.
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यया ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १४, ओवी ४१०
अर्थ : धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, (माझ्या मुलांच्या) विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणतो की, तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे. असे उल्लेख येतात.
‘लीळाचरित्रा’तील गुढीचा उल्लेख !
वर्ष १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणीमध्ये ‘… तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :…’ (लीळाचरित्र, लीळा २०८) असा उल्लेख येतो.
संतांच्या अभंगातील गुढीचा उल्लेख !
१. १५ व्या शतकात संत चोखामेळा यांच्या एका रचनेत ‘टाळी वाजवावी । गुढी उभारावी । वाट हे चालावी । पंढरीची ।।’, असा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्याही काळात गुढी उभारण्याची प्रथा होती, हे सिद्ध होते.
२. संत नामदेव (वर्ष १२७० – जुलै ३, वर्ष १३५०) संत जनाबाई (निर्वाण वर्ष १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष – १३३८) या सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख येतात. ‘१६ व्या शतकातील संत एकनाथांच्या (वर्ष १५३३-१५९९) धार्मिक काव्यात, तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यांतून संत एकनाथ ‘हर्षाची उभवी गुढी, ज्ञातेपणाची, भक्तीसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची ‘रुपके’ वापरतांना आढळतात.
३. अजून एक वैशिष्ट्य या गुढीचे दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणार्या समुहापैकी चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. गाथेत संत तुकाराम त्यांच्या अभंगात म्हणतात, ‘पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातींगुढी ।।’ (तुकाराम गाथा, अभंग ४५२९, ओवी २)
आता तुम्हीच ठरवा, गुढी न उभारून आपल्या छत्रपती संभाजी राज्यांच्या हिंदुत्वाचा विरोध करायचा कि गुढी उभारून हिंदुत्वाचा जयजयकार करून, संभाजी राजांना श्रद्धांजली वहायची आहे आणि गुढीपाडव्याविषयी जो भ्रम काही लोकांनी निर्माण केला आहे. तो दूर करायचा आहे. किमान सूज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे ! बहुत काय लिहिणे ? अगत्य असू द्यावे.
– लेखक (इतिहासाच्या पाऊलखुणा) आणि संचालक मंडळ (इतिहासाच्या पाऊलखुणा)
(‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ फेसबूकवरून साभार)