ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणांनी समृद्ध हिंदूंचा नववर्षारंभ !
नवसंवत्सर, म्हणजे गुढीपाडवा आहे. या शुभदिनानिमित्त आपण आज नववर्षारंभाची अधिक माहिती करून घेऊया. गुढीपाडव्याविषयी सर्वसाधारण प्रश्न आणि त्यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.
प्रश्न : वर्ष कोणतेही असो, ते १२ मासांचेच असते. यामागे कोणते कारण आहे ?
उत्तर : गुढीपाडव्यालाच वर्षप्रतिपदा किंवा वर्षारंभ म्हणतात. वैश्विक स्तरावर याला विविध नावे आहेत आणि त्यांचे नववर्षारंभही वेगळे असतात. ज्या प्रकारे इसवी सन १ जानेवारीपासून आरंभ होते, आर्थिक वर्ष एप्रिलपासून आरंभ होते, व्यापारी वर्ष कार्तिक शुक्ल प्रतिपदेला आरंभ होते, शैक्षणिक वर्ष जून मासापासून आरंभ होते, त्याच प्रकारे हिंदु वर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेला होते.
या सर्व वर्षांमध्ये एक समान विशेषता ही आहे की, सर्व वर्षे ही १२ मासांचीच असतात. वर्ष १२ मासांचे असले पाहिजे, हे सर्वांत प्रथम कुणी सांगितले ? तर वेदांनी सांगितले आहे. वेदांमध्ये म्हटले आहे, ‘द्वादश मासेही संवत्सरः ।’ वेदांनी सांगितले आणि सर्वांनी त्याला मान्यता दिली.
इंग्रजी वर्षारंभ एक जानेवारीलाच का आहे ? याचे काही कारण नाही; परंतु चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला नववर्षारंभ का आहे ? याची विविध कारणे आहेत. नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ! गुढीपाडव्याला, म्हणजे वर्षप्रतिपदेलाच नववर्षारंभ का ? याची कारणे आता आपण पाहूया.
प्रश्न : चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदूंचे नववर्ष का असते ? यामागे काही कारण आहे का ?
उत्तर : भगवद्गीतेत भगवंताने म्हटले आहे – कुसुमाकरी वसंतऋतू माझी विभूती आहे. पाडव्याच्या (प्रतिपदा) जवळपासच सूर्य वसंत संपात बिंदूवर येतो. म्हणजे तेव्हापासून वसंतऋतू आरंभ होतो. संपात बिंदूचा अर्थ काय आहे ? क्रांती वृत्त आणि विषुववृत्त, ही दोन वर्तुळे परस्परांना जेथे छेदतात, तो बिंदू ‘संपात बिंदू’ असतो. चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्षारंभ होण्याचे एक ऐतिहासिक कारण आहे.
१. ऐतिहासिक कारणे
या दिवशी शकांनी हुणांवर विजय प्राप्त केला. हूण विदेशी होते, आक्रमक होते, विध्वंसक होते. त्यामुळे भारतभूमीवर या आक्रमकांचे शकांनी निर्दालन केले.
सम्राट शालिवाहनाने आपल्या शत्रूवर या दिवशी विजय प्राप्त केला आणि त्या दिवसापासून शालिवाहन शक आरंभ झाले. प्रभु श्रीरामाने वालीचा वध याच दिवशी केला. चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ का असला पाहिजे ? याची ही ऐतिहासिक कारणे होती.
२. आध्यात्मिक कारणे
आता आपण आध्यात्मिक कारणे पाहूया. यामधील पहिले आध्यात्मिक कारण हे आहे की, या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि या दिवशी सत्ययुगाचा आरंभ झाला. अशा प्रकारे गुढीपाडवा, संपूर्ण वर्षभरात येणार्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, विजयादशमी या शुभदिनी प्रत्येकी एक आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदेला अर्धा अशा प्रकारे साडेतीन शुभमुहूर्त संपूर्ण वर्षभरात येतात. या शुभ मुहूर्तांची विशेषता ही आहे की, अन्य कोणत्याही दिवशी एखादे मंगल कार्य करायचे असेल, आरंभ करायचे असेल, तर मुहूर्त पहावा लागतो; परंतु या दिवशी सर्व घटिका ‘शुभ मुहूर्त’च असतात. त्यामुळे या दिवशी कोणत्याही वेळी आपण मंगल कार्याला आरंभ करू शकतो. त्यामुळे त्यांना ‘शुभ मुहूर्त’ असे म्हटले जाते. त्या व्यतिरिक्त आणखीही आध्यात्मिक कारणे आहेत.
प्रश्न : ‘प्रजापति लहरी प्रक्षेपित होतात’, असे सांगितले जाते. याविषयी काय सांगाल ?
उत्तर : चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्षारंभ होण्याचे एक आध्यात्मिक कारण हे आहे की, या दिवशी प्रजापति लहरी अधिकाधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. आता आपण जाणून घेऊया की, प्रजापति लहरी म्हणजे काय असते ? नक्षत्र लोकांपासून २७ लहरी प्रक्षेपित होतात. त्यांचे विभाजन होऊन एकूण १०८ लहरी पृथ्वीवर येतात. या १०८ लहरी चार प्रकारच्या असतात. प्रजापति, यम, सूर्य आणि संयुक्त लहरी असतात. या लहरींमुळे पृथ्वीवर विविध परिणाम होतात. हे परिणाम आपण समजून घेऊया.
१. प्रजापति लहरींमुळे वनस्पतींना अंकुर फुटून भूमीची क्षमता वाढते, बुद्धी प्रगल्भ होते, विहिरीत नवीन जलस्रोत निर्माण होतात, शरीरात कफप्रकोप होतो इत्यादी.
२. यम लहरींमुळे वर्षा होणे, वनस्पतींना अंकुर फुटणे, स्त्रियांना गर्भधारणा होणे, गर्भाची चांगली वाढ होणे, शरिरात वायुप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.
३. सूर्यलहरींमुळे भूमीमध्ये उष्णता वाढून वनस्पती जळून जातात, चर्मरोग होतात, भूमीची उत्पादन क्षमता अल्प होते आणि शरिरात पित्तप्रकोप होऊ लागतो.
४. संयुक्त लहरी म्हणजे प्रजापति, सूर्य आणि यम या तिन्ही लहरींचे मिश्रण होते. ज्या संयुक्त लहरींमध्ये प्रजापति लहरींचे प्रमाण अधिक असते, त्यांना प्रजापति संयुक्त लहरी, असे म्हणतात. अशा प्रकारे सूर्यसंयुक्त आणि यमसंयुक्त लहरीसुद्धा असतात.
चैत्र मासात प्रजापति लहरी आणि सूर्य लहरी अधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. चैत्र शुक्ल प्रतिपदेला प्रजापति संयुक्त लहरी आणि प्रजापति लहरी सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. या दिवशी सत्त्वगुण सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर येत असल्यामुळे चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस आध्यात्मिक दृष्टीने नववर्षारंभासाठी योग्य आहे.
प्रश्न : गुढीपाडव्याचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी तो कशा प्रकारे साजरा केला पाहिजे ?
उत्तर : आता आपण समजून घेऊया की, प्रत्यक्ष गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा केला जातो ?
१. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान केले पाहिजे. अभ्यंगस्नानाचा अर्थ आहे, शरिराला तेल लावून ते त्वचेमध्ये मुरू द्यावे आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्नान करावे. अभ्यंगस्नान केल्यामुळे रज-तम १ लक्षांशाने न्यून होते आणि सत्त्वगुण १ लक्षांशाने वाढतो. संपूर्ण वर्षात अभ्यंगस्नानासाठी ५ दिवस सांगितले आहेत. यांपैकी एक आहे गुढीपाडवा, दुसरा फाल्गुन कृष्ण प्रतिपदा, म्हणजे वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस. अन्य ३ दिवस दीपावलीमध्ये येतात, नरक चतुर्दशी, अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा (दिवाळीचा पाडवा) असतो.
अभ्यंगस्नान आणि गुढीचे पूजन करण्यापूर्वी प्रथम देश-काल कथन करायचे असते. देश-काल कथन करण्याची आपली पद्धत विशेष आहे. यामध्ये ब्रह्मदेवाच्या जन्मापासून आजपर्यंत किती वर्षे ? किती युगे झाली आहेत ? हे सांगितले जाते. देश-काल कथन केल्यामुळे या प्रचंड काळाच्या तुलनेत आपण किती क्षुद्र आहोत, हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होते.
२. या दिवसाची दुसरी कृती, म्हणजे दाराला तोरण लावणे. गुढी उभी करण्यापूर्वी आंब्याची पाने लाल फुलांसह दोर्यात ओवून तोरण करून घराच्या दारावर लावले पाहिजे; कारण लाल रंग शुभसूचक आहे. दारावर तोरण लावल्यामुळे देवतांच्या गंधलहरी वास्तूमध्ये आकृष्ट होतात. या दिवशी करावयाची आणखी एक कृती, म्हणजे नित्य पूजन करणे. घरातील रूढीनुसार नियमितरूपाने होणारे नित्य देवतापूजन करावे. काही लोक या दिवशी ‘संवत्सर पूजन’ही करतात.
यानंतर या दिवसाची पुढील कृती, म्हणजे गुढी उभी करणे आणि तिचे पूजन करणे. प्रतिपदेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी प्रवेशद्वारासमोर सडा टाकून रांगोळी काढावी. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गुढी उभी करावी. जेथे गुढी उभी करणार, तिच्या समोर सुंदर रांगोळी काढावी.
गुढी उभी करण्यासाठी वेळूची काठी किंवा बांबू , साखरेच्या गाठींची माळ, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जरीकाठाचे वस्त्र, आंब्याच्या पानांची डहाळी, कडूलिंबाची पाने किंवा कडूलिंबाची मोहरयुक्त डहाळी, गुढी उभी करण्यासाठी पाट, कलश आणि नित्य पूजा साहित्य घ्यावे.
आता गुढी कशी उभी करावी ? याची कृतीही थोडक्यात समजून घेऊया.
१. बांबूच्या उंच काठीच्या टोकाला हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जरीकाठाचे वस्त्र बांधावे. वस्त्र बांधतांना त्याच्या चुण्या करून बांधाव्यात.
२. वस्त्रावर कडूलिंबाची कोवळी पाने किंवा मोहरासहित डहाळी आणि आंब्याच्या पानांची डहाळी बांधावी. त्यानंतर साखरेच्या गाठींची माळ बांधावी. त्यावर लाल फुलांची माळ बांधावी.
३. कलशावर बोटाने ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलश बांबूच्या लाकडाच्या टोकावर पालथा घालावा. अशा प्रकारे गुढीला सजवावे. त्यानंतर ही गुढी लहानशा पाटावर उभी करावी.
४. या गुढीचे ‘ब्रह्मध्वजाय नमः’ म्हणून संकल्पपूर्वक पूजन करावे. गुढीला हळद अर्पण करावी. त्यानंतर कुंकू वहावे. अक्षता आणि फुले अर्पण करून धूप दाखवावा आणि निरांजनाने आरती करावी.
५. पूजेनंतर प्रार्थना करावी –
हे ब्रह्मदेव, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आम्हाला ग्रहण करता येऊ देत. यांपासून मिळणार्या शक्तीमध्ये विद्यमान असलेले चैतन्य सतत टिकून राहू दे. मला मिळणार्या शक्तीचा उपयोग माझ्याकडून साधना करण्यासाठीच होऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
यानंतर गुढीला कडूलिंबाच्या पानांचा नैवेद्य दाखवावा.
गुढी ही विजयाचे प्रतीक आहे. रावणाचा वध करून परतलेल्या प्रभु श्रीरामाचे स्वागत अयोध्यावासियांनी गुढ्या उभ्या करून केले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य, म्हणजे पंचांग श्रवण करणे. या दिवशी नवीन पंचांग आणून त्याचे श्रवण केले पाहिजे. पंचांग श्रवण केल्यामुळे गंगास्नानाचे फळ मिळते. गुढीपाडव्याच्या दिवशी आणखी एक महत्त्वाची कृती, म्हणजे कडूलिंबाचा प्रसाद ग्रहण करणे ही होय. हा कडूलिंबाचा प्रसाद कसा बनवला जातो ? हेही समजून घेऊया.
प्रसादासाठी आवश्यक साहित्य
कडूलिंबाचा मोहोर आणि कोवळी पाने, चण्याची भिजवलेली डाळ किंवा भिजवलेले हरभरे, मध, जिरे आणि हिंग.
प्रसाद बनवण्याची कृती
कडूलिंबाचा मोहोर आणि १०-१२ कोवळी पाने, ४ चमचे भिजवलेली डाळ किंवा भिजवलेले हरभरे, एक चमचा मध, एक चमचा जिरे अन् चवीपुरते हिंग, मीठ एकत्रित करून वाटावे आणि प्रसाद बनवावा. तो प्रसाद सर्वांना वाटावा.
कडूलिंबामध्ये प्रजापति लहरी ग्रहण करण्याची क्षमता सर्वाधिक असते. त्यामुळे कडूलिंबाचा प्रसाद ग्रहण केला जातो. या दिवशी शेतात नांगर चालवावा. नांगर चालवण्यामुळे भूमीचा खालचा थर वर येतो. प्रजापति लहरींचा संस्कार या मातीवर होतो आणि मातीमध्ये बीज अंकुरित करण्याची क्षमता कित्येक पटीने वाढते. या दिवशी शेतीची अवजारे आणि बैल यांच्यावर अभिमंत्रित अक्षता अर्पण कराव्यात. शेतीचे काम करणार्यांना उत्तम वस्त्रे द्यावीत. त्यासह अन्य दानधर्मही करावा. मंगलगाणी ऐकावीत उदा. ते ऐकल्यानंतर इतर सुखदायक कृतीही कराव्यात. सूर्यास्ताच्या वेळी आपण गुढी उतरून ठेवतो.
सूर्यास्तानंतर त्वरित गुढी खाली उतरून ठेवावी. ज्या भावाने गुढी उभी केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवल्यामुळे चैतन्य मिळते. गुढी खाली उतरवतांना कुटुंबप्रमुखाने गुढीला हळदकुंकू वहावे आणि त्यानंतर गुढीला नमस्कार करावा. त्यानंतर गूळ किंवा मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. नंतर सर्वांनी मिळून पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.
‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती समाविष्ट झाली असेल, ती मला प्राप्त होऊ द्या. ही शक्ती राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी उपयोगात येऊ द्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
प्रार्थना केल्यानंतर गुढी खाली उतरवावी. गुढीला अर्पण केलेले सर्व साहित्य दैनंदिन वस्तूंजवळ ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले आणि आंब्याची पाने वहात्या पाण्यात विसर्जित करावीत.
नववर्षाच्या आरंभानिमित्त आपण शुभेच्छापत्र पाठवतो. हे पत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेला पाठवावे; कारण की नववर्षारंभासाठी हाच योग्य दिवस आहे.
प्रश्न : पंचांग श्रवणाविषयी आपण आणखी काय सांगाल ?
उत्तर : पंचांग श्रवण : ज्योतिष सांगणार्याचे पूजन करून त्यांचे किंवा पुरोहिताद्वारा नूतन वर्षाचे पंचांग, म्हणजे वर्षफल श्रवण करतात.
पंचांग श्रवणाचे फळ अशा प्रकारे सांगितले आहे : तिथिच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. दिवसाच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो, योगश्रवणाने रोगनाश होतो, करण श्रवणाने नियोजित कार्य साध्य होते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फळ लाभते.
प्रश्न : नववर्षाच्या निमित्त आपण कोणते आवाहन करणार ?
चैत्र प्रतिपदा – गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ या दिवशी आहे, या निमित्ताने
१. आपल्या घरी हा सण साजरा करून भ्रमणभाषवरून मित्र, परिवार यांना सणाचे शास्त्र सांगू शकता.
२. स्वतः भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करून इतरांनाही याविषयी सांगू शकतो.
३. नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात त्यांचे प्रबोधन करू शकतो. त्यांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगू शकता.
४. सामाजिक माध्यमांद्वारे, म्हणजे फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सॲप यांद्वारे मातृभाषेत नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.
५. गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र हिंदु नववर्षाचे महत्त्व सांगणारे ‘ऑनलाईन’ व्याख्यानांचे आयोजन करावे.
६. ‘आदर्श गुढी कशी उभी करावी ?’, गुढीपाडव्याचे महत्त्व यांची माहिती देणारे चलचित्र (व्हिडिओ) ‘ऑनलाईन’ दाखवण्याचे नियोजन करावे.
अशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही करू शकता.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.