Palasnath Temple : ४६ वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत असलेल्या उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले !
इंदापूर (जिल्हा पुणे) – येथील पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर धरणाचे पाणी न्यून होत असल्यामुळे सध्या दिसू लागले असून लवकरच ते पूर्णपणे खुले होण्याच्या मार्गावर आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर ४६ वर्षांपूर्वी पुनर्वसित झालेल्या अनेक गावांच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. उजनी जलाशयामध्ये पाण्याखाली गेलेले प्राचीन श्री पळसनाथाचे मंदिर १ सहस्र वर्षांचा प्राचीन इतिहास लाभलेलेे मंदिर आहे. हे मंदिर मागील ४६ वर्षे पाण्यात राहून आजही सुस्थितीत असल्याचे पहायला मिळत आहे. हे मंदिर अवर्षणाच्या दिवसांमध्ये अधूनमधून पूर्णपणे खुले होते. या वेळी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून पर्यटक, पुरातन वास्तूप्रेमी, प्राचीन मंदिर अभ्यासक, वास्तूशास्त्र अभियंते, कारागीर, इतिहासप्रेमी, विद्यार्थी आदी मोठी गर्दी करतात. अवर्षणाच्या काळामध्ये हे मंदिर उघडे पडल्यानंतर या ठिकाणी पर्यटनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
१ सहस्र वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री पळसनाथ मंदिराचे शिखर प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून गेल्या ४६ वर्षांपासून पाण्यात तग धरून उभे आहे. सप्तभूमीज पद्धतीचे हे शिखर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेवच्या पुलावरून उत्तर बाजूकडे पाहिले असता स्पष्ट दिसते. मंदिराच्या गर्भगृहामध्ये अत्यंत कोरीव काम, सभामंडप अत्यंत देखणी मांडणी आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडी खांबावर उभे राहिलेले हे प्राचीन मंदिर आहे. ४६ वर्षांपूर्वी पाण्याखाली गडप होऊन या मंदिराचे अर्धवट शिखर उघडे राहिले. मंदिराच्या भोवती असणार्या ओवर्या आणि इतर छोटी मंदिरे मंदिराच्या भोवतालचा तट पाण्याखाली गेला; परंतु हे मंदिर आजही तितक्याच दिमाखाने पाण्यामध्ये उभे आहे.